पुणे : वृत्तसंस्था
देशभर दिवाळीचा उत्साह सुरु असताना आता महाराष्ट्रात पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. गेल्या आठवडाभर राज्यात उन्हाचे चटके जाणवत होते, मात्र सोमवारी पहाटेपासूनच मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाने झोडपले. मुंबई, सोलापूर, सातारा, पुणे आणि कोकणातील काही भागांत अचानक आलेल्या सरींनी नागरिकांना गारवा मिळवून दिला असला तरी शेतकऱ्यांच्या कपाळावर मात्र चिंता वाढवणाऱ्या आठ्या उमटल्या आहेत. मुंबईत आज सकाळीच मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे रस्त्यांवर पाणी साचले आणि कार्यालयीन वेळेत वाहतूक कोंडी झाली. हवामान खात्याने मुंबई आणि आसपासच्या भागासाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस राज्यात ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पावसाच्या सरी कायम राहणार आहेत. मुंबईत कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मात्र, विदर्भात कोरडे वातावरण राहण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.
मुंबई शहरात सोमवारी सकाळपासूनच पावसाने जोर धरला. अंधेरी, वांद्रे, दादर, चेंबूर आणि घाटकोपर या भागांत मुसळधार सरी कोसळल्या. दिवाळी नंतर वातावरणात उकाडा वाढला होता, पण अचानक आलेल्या पावसामुळे शहराला दिलासा मिळाला. मात्र, अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने कामावर निघालेल्या मुंबईकरांची मोठी तारांबळ उडाली. सायन, किंग्ज सर्कल आणि कुर्ला परिसरात वाहतूक संथ गतीने सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पावसामुळे लोकल रेल्वेचे काही गाड्या उशिराने धावत आहेत. हवामान खात्याने पुढील 24 तासांत शहर आणि उपनगरांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढला आहे. सोलापूर आणि सातारा जिल्ह्यांत गेल्या काही तासांपासून मुसळधार पावसाची हजेरी आहे. सोलापुरात गेल्या तासाभरात तुफान पाऊस पडला असून शहरातील काही भागांत विजेचा पुरवठा खंडित झाला. साताऱ्यातील कराड, कोरेगाव आणि पाटण तालुक्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. हवामान खात्याने आधीच साताऱ्यासाठी यलो अलर्ट जारी केला होता. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली असून, शहरात साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीचा ताण वाढला आहे. दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मात्र संध्याकाळी थंडगार वाऱ्याने दिलासा दिला.


