छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारताचे संविधान, तिरंगा ध्वज तथा महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट कायद्याची प्रत स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे संघाचा संविधान, तिरंगा व स्वतःची नोंदणी करण्यास ठाम विरोध असल्याचे स्पष्ट होते, असा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. वंचित बहुजन आघाडीने शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. यासाठी हजारो आंबेडकर अनुयायी शहरातील क्रांती चौकात जमले होते. पोलिसांनी त्यांच्या मोर्चाला परवानगी नाकारली, पण तरीही वंचितचे कार्यकर्त्यांनी आपला मोर्चा काढला. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भारताचे संविधान, तिरंगा व महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट अॅक्टची प्रत देण्याचा प्रयत्न केला. पण संघाने त्यांचा स्वीकार करण्यास नकार दिला. वंचितचा भारतीय राष्ट्रध्वजाचा सन्मान न करणाऱ्या संघाला तिंरगा देण्याची इच्छा होती. कोणतीही नोंदणी नसणाऱ्या या संघटनेला महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट अॅक्टची प्रत देण्याची इच्छा होती. पण त्यांनी त्यांच्या जागी औरंगाबादच्या डीसीपींनी या गोष्टी स्वीकारल्या, असे वंचितने म्हटले आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर क्रांती चौक ते बाबा पेट्रोल पंपापर्यंत पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. वंचितने यावरही आक्षेप घेतला. पोलिस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बचाव का करत आहेत? असा प्रश्न या प्रकरणी पक्षाने उपस्थित केला आहे. हा ‘जन आक्रोश मोर्चा’ आरएसएसच्या कार्यालयाकडे (बाबा पेट्रोल पंप जवळ) जात असताना पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावत गर्दीला कार्यालयाकडे जाण्यापासून अडवले. या अडवणुकीमुळे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि पोलिस आमनेसामने आले.
या ‘जन आक्रोश मोर्चात’ वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची उपस्थिती होती, ज्यामुळे भीमसैनिकांमध्ये मोठा उत्साह संचारला. मोर्चात सहभागी झालेल्या युवक, महिला आणि नागरिकांनी हातात फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी ‘RSS मुर्दाबाद’ च्या घोषणांनी औरंगाबाद दणाणून गेला. तत्पूर्वी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या जागी मनुस्मृतीला कायदा बनवण्याचे कारस्थान रचत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. भारताने बाबासाहेबांचे संविधान स्वीकारले, तेव्हा संघाने केवळ त्याचा विरोधच केला नाही, तर त्याचे दहनही केले होते, असे ते म्हणालेत. त्यांच्या या आरोपामुळे वंचित व संघातील राजकीय कटूता आणखी वाढण्याची शक्यता आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तिरंग्याचा विरोध केला. त्यांना बाबासाहेबांच्या संविधानाच्या जागी मनुस्मृतीला कायदा म्हणून लागू करायचे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान भारताने स्वीकारले तेव्हा संघाने केवळ त्याचा विरोधच केला नाही, तर संविधान जाळून आपला रोष व्यक्त केला. संघ समानतेचा द्वेष करतो. दलित, आदिवासी व ओबीसींची घृणा करतो. बौद्ध, मुस्लिम व ख्रिश्चन समाजाचाही द्वेष करतो, असे ते म्हणालेत. प्रकाश आंबेडकरांनी आरएसएस विरोधातील जनआक्रोश मोर्चात शांतता पाळण्याचेही आवाहन केले आहे. मनुवादी शक्ती आपली शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतील. पण आपल्याला शांतता कायम ठेवायची आहे, असे ते म्हणालेत.


