मुंबई : वृत्तसंस्था
देशभरात आज बहिण भावाच्या अतूट नात्याचा महत्वाचा दिवस म्हणजेच भाऊबीज सण आहे. या सणानिमित्त बहिणीकडून भावाचे औक्षण केले जाते. त्यामुळे आजच्या दिवसाला अनेक अर्थांनी महत्व आहे. राज्यातील राजकीय नेत्यांकडून बहिण भावाचा सण म्हणजचे भाऊबीज साजरी केली जात आहे. ठाकरे कुटुंबातही भाऊबीज निमित्ताने आनंदाचे वातावरण आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा ठाकरे कुटुंब एकत्र आले आहेत. राज ठाकरे यांच्या सख्या भगिनी जयजयवंती ठाकरे देशपांडे या उद्धव ठाकरे ठाकरेंना औक्षण करणार आहेत. या सगळ्या ठाकरे कुटुंबाच्या एकत्रीकरणाच्या घडामोडीत उद्धव ठाकरेंनी उबाठाच्या रणरागिनी मुलूख मैदानी तोफ सुषमा अंधारे यांच्याशी फोनद्वारे संवाद साधत भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याबाबत स्वतः अंधारे यांनी माहिती दिली आहे.
याविषयी त्यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. तसेच फोन झाल्याचा मोबाईल स्क्रीन शॅाटही शेअर केला आहे. भाऊबीजेच्या निमित्ताने सुषमा अंधारे गावी गेल्या आहेत, मात्र तरीही उद्धव ठाकरेंनी मायेचा धागा तुटू दिला नाही. सकाळीच उद्धव ठाकरे यांनी फोन करुन शुभेच्छा दिल्या, असल्याचे सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्टमध्ये सांगितले आहे.
सुषमा अंधारेंचे फेसबुक पोस्ट
आज भाऊबीज.. अर्थात मी गावी परळीत आहे. खटल्याचं घर आहे. त्यामुळे सगळे भाऊ बहीण आम्ही एकत्र असतो. त्यात सख्खे, सावत्र, चुलत मावस मानलेले हा काही प्रकार नाही.. कुटुंब आहे. सगळे कुटुंबाचा भाग आहेत. पण गावी असल्याने मुंबईत पोचता आलं नाही… पण आपण पोचू शकलो नाही तरी तंत्रज्ञान आहे की मदतीला. सकाळी पक्षप्रमुख उद्धव साहेबांचा फोन आला. वाटलं काही महत्वाची पक्षाची भूमिका मांडण्यासंदर्भात असेल.
हॅलो म्हणण्या आधीच, ताई भाऊबीजेच्या शुभेच्छा. एवढी खंबीर बहीण मिळायला भाग्य लागतं.. तुमच्यासारखी लढाऊ बहीण सगळ्यांना लाभो… यावर आपण काय बोलावं… मी नुसतेच आभार मानले.. “काय गिफ्ट द्यायचं तुम्हाला.. ” सरांचं वाक्य मध्येच तोडत म्हटलं, भरभरून आशीर्वाद द्या सर फक्त…. पण मनात वाक्य पुटपुटत होते, भाग्य तर आमचं महाराष्ट्राच्या कुटुंबप्रमुखांनी एका साधारण गावखेड्यातील मध्यमवर्गीय बहिणीला इतक्या आवर्जून फोन करून शुभेच्छा द्यावा… इडा पिडा जाऊदे… भावाचं राज्य येऊ दे… भाऊ माझा सुखी राहू दे… त्याचा वंशवेलु गगनाला भिडू दे


