मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील आगामी स्थानिक निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. मात्र महायुती निवडणुकीत एकत्र लढणार की नाही? याबाबत सातत्याने चर्चा सुरू आहेत. दुसरीकडे, ठाणे, नवी मुंबईसह 19 ठिकाणच्या पालिका निवडणुकीत जागावाटपावरून महायुतीत मतभेद सुरू आहेत.
महायुतीत ठाणे,नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, सांगली या जागांवर मतभेद आहेत. त्याशिवाय सातारा, मावळ, लोणावळा, रायगड, नाशिक, जळगाव, धुळे, हिंगोली, नांदेड, अहिल्यानगर आणि नंदुरबार या जागांवरही महायुतीत जागावाटपावरून धुसफुस समोर आली आहे.
एकीकडे जागा वाटपावरुन अंतर्गत वाद समोर येत असताना, दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी मात्र अंतर्गत वादाच्या चर्चांना फेटाळून लावत महायुती म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. विरोधकांना फायदा होऊ नये यासाठी महायुती मुंबईत एकत्र लढणार तर राज्यातील काही ठिकाणी निवडणुकीला स्वतंत्रपणे सामोरं जाणार आणि नंतर एकत्र येणार असल्याची माहिती काही माध्यमांमधून समोर येत आहे. मात्र जागावाटपाचे हे चित्र आता काही दिवसातच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.


