जळगाव : प्रतिनिधी
तब्बल 8 वर्षांपासून फरार असलेल्या सोन्याच्या अपहार प्रकरणातील आरोपीस रामानंद नगर पोलिसांनी उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथून अटक केली असून, त्याच्याकडून 11 लाख 90 हजार रुपये किमतीचे 100 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. 30 मार्च 2017 रोजी सचिन वसंतराव भामरे (रा. गांधी नगर, जळगाव) यांनी त्यांच्या साई ज्वेलर्स या पिंप्राळा परिसरातील दुकानात काम करणाऱ्या सुशांत सुनिल कुंड्डु (रा. हावडा, पश्चिम बंगाल) या कामगारास दागिने तयार करण्यासाठी सुमारे 30 तोळे सोने दिले होते. मात्र, आरोपीने ते सोने अपहार करून पसार होत आपल्या मूळ गावी पश्चिम बंगालला पलायन केले. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 42/2017 भादंवि कलम 408, 34 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. गेल्या अनेक वर्षांपासून पोलिसांनी वेळोवेळी आरोपीच्या शोधासाठी त्याच्या मूळ गावी प्रयत्न केले होते, मात्र तो सापडत नव्हता. तरीही हा गुन्हा ‘कायम तपास’वर ठेवत तपास यंत्रणा सतत कार्यरत होती.
सपोनि भुषण कोते यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक वाराणसी, उत्तर प्रदेश येथे रवाना करण्यात आले. तेथे शोधमोहीम राबवून आरोपी सुशांत कुंड्डु (वय 39) यास ताब्यात घेण्यात आले. त्यास दि. 13 ऑक्टोबर 2025 रोजी अटक करण्यात आली. सपोनि भुषण कोते यांनी तपास पुढे सुरू ठेवत, आरोपीकडून कोलकाता, पश्चिम बंगाल येथून अपहार केलेले सुमारे 100 ग्रॅम वजनाचे, अंदाजे 11 लाख 90 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात यश मिळवले.
या कामगिरीमध्ये पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि भुषण कोते, पो.ह. जितेंद्र राजपुत, पो.ना. योगेश बारी, पो.शि. अनिल सोननी, दिपक वंजारी, अतुल चौधरी यांचा महत्त्वाचा सहभाग होता. या उल्लेखनीय तपासामुळे तब्बल आठ वर्षांपूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यात न्यायाची प्रक्रिया पुढे सरकली आहे. जळगाव जिल्हा पोलीस दलाने दाखवलेली चिकाटी आणि सातत्य हे खरोखरच कौतुकास्पद असून, जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा बसविण्याच्या दृष्टीने हे पाऊल मोलाचे आहे.


