


अमळनेर : प्रतिनिधी
अमळनेर तालुक्याचा अतिवृष्टी नुकसान भरपाई चा दि. १८/१०/२०२५ चा शासन निर्णय मध्ये समावेश नसल्याचे जाहीर होताच जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. गुलाबरावजी पाटील यांना पाळधी येथे जाऊन मा. आमदार शिरीषदादा चौधरी यांनी भेट घेवून अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानी बाधितांना मदत मिळणे बाबत. निवेदन दिले.
निवेदनात अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी आम्ही वेळोवेळी मागणी केली आहे. वरील संदर्भीय शासन निर्णयानुसार जळगाव जिल्ह्यातील ३२५३५९ शेतकऱ्यांना २४७२६२.०१ हेक्टर क्षेत्राकरिता रु.२९९९४.४७ लाख इतकी मदत घोषित झाली असून याबाबत सविस्तर माहिती घेतली असता यामध्ये अमळनेर तालुक्याचा कुठेही समावेश करण्यात आलेला नाही.
यामुळे अमळनेर तालुक्यातील शेतकरी हे पूर्णपणे शासकीय मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मी आपणास शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी प्रतिनिधी म्हणून विनंती करतो की, आपण तात्काळ याबाबतचा सुधारित शासन निर्णय निर्गमित करून अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे ही विनंती. अश्या आशयाचे निवेदन दिले आहे. पालकमंत्री श्री गुलाब भाऊ पाटील यांनी लवकरच अमळनेर तालुक्यातील शेतकरी बांधवांचा हिताचा निर्णय घेऊ असे श्री चौधरी यांना आश्वासित केले आहे. प्रसंगी अमळनेर शिवसेना तालुका प्रमुख सुरेश पाटील, किशोर पाटील, रोशन सोनवणे,मा. नगरसेवक अनिल महाजन, मा नगरसेवक पंकज चौधरी व कार्यकर्ते उपस्थित होते .


