मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली. मात्र ही तुटपुंजी मदत करण्यात आल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली. यावरूनच आता माजी मंत्री बच्चू कडू सोयाबीन खरेदी केंद्रावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांसाठी 21, 22 तारखेपर्यंत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू न केल्यास पालकमंत्र्यांच्या गाड्या फोडू, असा थेट इशाराच बच्चू कडू यांनी दिला आहे.
बच्चू कडू यांनी काल नांदेड दौऱ्यादरम्यान माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, “शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ देणार नाही अशा बऱ्याच गोष्टी मी ऐकतो. शेतकऱ्यांचे आयुष्यच अंधारात आहे. दिवाळीचा काय विषय आहे. फडणवीस साहेब म्हणतात, सगळ्यांना एकरी पाच-सहा हजार रुपये देणार आहोत. मला फडणवीस यांना प्रश्न विचारायचा, पाच-सहा हजारात दिवाळी कशी साजरी होईल? तुमची दिवाळी दोन लाखाचे फटाके फोडून साजरी करतात. शेतकऱ्यांची दिवाळी पाच हजार रुपयात साजरी होईल. थोडी-थोडी लाज वाटली पाहिजे. लाज असेल तर, असली तर वाटेल.”
“महाराष्ट्रात अजूनही सोयाबीनचे खरेदी केंद्र सुरू केले नाहीत. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सुरू झाले. महाराष्ट्रात का नाही? आमदार, खासदार, पालकमंत्री, अधिकाऱ्यांची मस्त मजा सुरू आहे. दिवाळीची सुट्टी काढून सगळे पळाले. कापसाची, सोयाबीनची खरेदी कधी सुरू करणार आहात? पंजाबच्या शेतकऱ्यांचा 90 टक्के शेतीमाल खरेदी होतो. हमीभावात आमचा सहा टक्के पण होत नाही.”



