चोपडा : प्रतिनिधी
शहादा येथील न्यायालयाच्या तत्कालीन न्यायाधीशांच्या निवासस्थानासह चोपड्यातील निवृत्त कर्मचाऱ्याच्या घरी चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील सेवानिवृत्त इसम विजय नारायण बाविस्कर (६९, यावल रोड, चोपडा) यांच्या घरात मागील महिन्यात घरफोडी झाली होती. अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल होता. पोलिसांनी तपासादरम्यान आरोपी प्रकाश विजय पावरा (२८, तोरणमाळ, जि. नंदुरबार) याने हा गुन्हा केल्याचे निष्पन्न केले. त्याला दि. १२ ऑक्टोबर रोजी शिरपूर शहरातून ताब्यात घेण्यात आले. प्रकाश हा घरफोडी व चोरी करणारा सराईत आरोपी असून त्याच्यावर शहादा आणि दोंडाईचा पोलिस स्टेशनमध्ये १० ते १२ घरफोडीचे गुन्हे यापूर्वीही नोंदवले आहेत. त्याने यापूर्वी दोंडाईचा (नंदूरबार) येथे एका वकीलांच्या घरी घरफोडी करून चोरी केली होती.
शहादा येथील न्यायालयाच्या तत्कालीन न्यायाधीशांच्या शासकीय निवासस्थानीही त्याने घरफोडी केली होती. या गुन्ह्यांमध्ये त्याला पूर्वीही अटक करण्यात आलेली आहे. चोपडा शहर पोलिसांनी शिताफिने आरोपीच्या मोबाईल २ लोकेशनचा अभ्यास करून त्यास अटक केली. त्याच्याकडून चोपडा येथील घरफोडीमधील मुद्देमाल शिरपूर येथून हस्तगत करण्यात आला आहे. हस्तगत केलेल्या वस्तूमध्ये सोने, चांदीचे दागिने, मोबाईल आणि मोटारसायकल यांचा समावेश आहे. या मुद्देमालाचे मूल्य १ लाख चार हजार ७० रुपये आहे. तपास कामी शहर पोलिस निरीक्षक मधुकर साळवे, सहायक पोलिस निरीक्षक एकनाथ भिसे, पोलिस उपनिरीक्षक चेतन परदेशी, ज्ञानेश्वर जवागे, मदन पावरा, अजिंक्य माळी, योगेश पाटील आणि विलास पारधी यांनी मेहनत घेतली आहे. याबाबतचा अधिक तपास पोउनि चेतन परदेशी करत आहेत.


