जळगाव : प्रतिनिधी
स्थानिक गुन्हे शाखेने मुक्ताईनगर आणि वरणगाव परिसरातील पेट्रोल पंपांवर झालेल्या सशस्त्र दरोड्याचा गंभीर गुन्हा अवघ्या चार दिवसातच उघडकीस आणला आहे. पोलिसांनी आंतरजिल्हा दरोडेखोर टोळीतील सहा संशयित आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एकूण १ लाख ३३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
बुधवारी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ९ ऑक्टोबर रोजी रात्री १० ते ११ च्या दरम्यान बोदवड चौफुली मुक्ताईनगर येथील ‘रक्षा टोफ्युअल’, कर्की फाटा येथील ‘मनुभाई आशीर्वाद पेट्रोलपंप’ आणि वरणगाव शिवारातील ‘सय्यद पेट्रोलपंप’ या तीन ठिकाणी पाच ते सहा अनोळखी व्यक्तींनी दरोडा टाकला होता. आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवून मुद्देमाल चोरून नेला होता.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष आदेश दिले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पाच तपास पथकांनी चार दिवसांच्या अथक परिश्रमानंतर तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा मुक्ताईनगर, वरणगाव ते नाशिक आणि अकोलापर्यंत माग काढला. पोलिसांनी नाशिक येथून चार आरोपींना आणि अकोला येथून एका आरोपीसह एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये भुसावळ, अकोला आणि ब-हाणपूर येथील रहिवाशांचा समावेश आहे. अटक आरोपी सचिन भालेराव हा जिल्ह्यातून यापूर्वीच हद्दपार केलेला गुन्हेगार आहे.
पोलिसांनी दरोडेखोरांकडून ४० हजार रोख रक्कम, ३ गावठी पिस्तूल, ५ मॅगझीन, १० जिवंत काडतुसे आणि ९ मोबाईल फोन असा एकूण १ लाख ३३ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.


