मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महाविकास आघाडीसह मनसे आणि इतर विरोधी पक्षांची एकत्रित शिष्टमंडळ राज्य निवडणूक आयुक्त आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत निवडणूक प्रक्रियेतील त्रुटी, मतदार यादीतील गोंधळ आणि प्रशासनाच्या पक्षपाती कारभाराबाबत मुद्दे उपस्थित करण्यात आले.
विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आज पुन्हा एकदा निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन मतदार यादी आणि बोगस नावावरुन आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने विविध मुद्द्यांवर संवाद साधला.बैठक झाल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी एकत्र वाय.बी.चव्हाण येथे पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
पत्रकार परिषदेत जयंत पाटील, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि उद्धव ठाकरे यांनी मतदार याद्यातील घोळ आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. सर्व राजकीय पक्ष एकत्र आले आहेत, भाजपला सुद्धा आम्ही पत्र दिले होते, पण ते आले नाहीत. काही लोक मतदार याद्यांशी खेळत आहेत आणि हवे ते लोक घुसवत आहेत हे आम्ही सांगितले होते.
आयुक्त म्हणून त्यांना अधिकार आहे की ते कटपुतळे आहेत, जे वरून त्यांना कोणी हलवतय, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. मी तर म्हणालो आहे इलेक्शन असे घ्यायचे असेल तर इलेक्शन न घेता सिलेक्शन करून टाका. पण, आम्ही हुकूमशाही सहन करणार नाही. राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला बाप कोण? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे. जोपर्यंत मतदार याद्या सुधारत नाहीत, तोपर्यंत निवडणुका घेऊ नका असे आम्ही सांगितले आहे, अशी माहितीही उद्धव ठाकरेंनी दिली. निवडणूक म्हटले की, राजकिय पक्ष आले, मतदार आले.निवडणूक आयोग हे फक्त निवडणूक घेतात मात्र राजकिय पक्ष ते लढवतात. मात्र राजकिय पक्षांना निवडणूक आयोग यादया दाखवत नसेल तर इकडे घोळ आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
मतदार यादया न दाखवून काय भेटणार आहे? या मतदार याद्यांमध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणूका घेऊ नका, असे राज ठाकरेंनी सांगितले. ५ वर्ष निवडणूका झाल्या नाहीत, आणखी ६ महिने नाही झाल्या, तर काय फरक पडतो. उद्या-परवामध्ये काय निर्णय घेतात ते पाहू, नंतर सर्व आम्ही आमचा निर्णय सांगू, असे राज ठाकरेंनी स्पष्ट केले.


