मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारच्या एका निर्णयावरून भाजपवर जोरदार टीका केली आहे. मुंबईतील नरिमन पॉइंट येथे प्रहार जनशक्ती पक्षाला दोन वर्षांपूर्वी देण्यात आलेले पक्ष कार्यालय राज्य सरकारने रद्द केले आहे. जागा रद्द करताना कोणतीही पर्यायी जागा न दिल्याने बच्चू कडू संतप्त झाले आहेत. या निर्णयावरून त्यांनी जोरदार टीका करत भाजपला ‘विष’ संबोधले आहे. तसेच भाजपची तुलना ही सापाशी केली आहे.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना मंत्रालयाजवळ असलेल्या ‘जनता दल सेक्युलर’ (JDS) पक्षाच्या कार्यालयाची जागा कमी करून ती प्रहार जनशक्ती कार्यालयाला उपलब्ध करून दिली होती. फडणवीस सरकारने हा निर्णय बदलला असून, बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा मित्रपक्ष असलेल्या जनता दल सेक्युलरला पुन्हा संपूर्ण जागा परत देण्यात आली आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या बच्चू कडू यांना मोठा झटका बसला आहे. बच्चू कडू हे गेले काही दिवस महायुतीवर टीका करताना दिसून येत आहे. यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
बच्चू कडू म्हणाले की, भाजप म्हणजे अख्खे विषच आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी देखील हा पक्ष विषारी बनला आहे. पक्षासाठी रक्ताचे पाणी करणाऱ्या, लढणाऱ्या कार्यकर्त्यालाच तर ते जवळ करत नाहीत. विधानसभा, विधान परिषद सदस्य असो किंवा खासदार, या पदावर मूळ भाजपचा कार्यकर्ता दुर्बिन लावून शोधला, तरी सापडत नाही. ते भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांसाठी विषारी ठरत असतील, तर माझी काय स्थिती राहणार आहे अशी तीव्र नाराजी त्यांनी व्यक्त केली.
बच्चू कडू यांनी यावेळी भाजपची तुलना सापाशी केली. भाजप हा साधासुधा पक्ष नाही, दुधातही आणि पेढ्यातही विष आहे, हे भाजपने दाखवून दिले आहे. साप जसा दूध पाजल्यावरही विष सोडतो, तसा भाजप आहे. ते कधी उलटून विष सोडतील हे सांगता येत नाही. मी भारतीय आहे, असे म्हणण्यापेक्षा मी भारतीय जनता पक्षाचा आहे, असे म्हटले तरच तुम्ही टिकाल, अशी स्थिती त्यांनी करून ठेवली आहे, असा टोला बच्चू कडू यांनी लगावला.
नेमके प्रकरण काय?
राज्य सरकारने ऑगस्ट 2023 मध्ये महायुतीच्या काळात प्रहार जनशक्ती पक्षाला नरिमन पॉइंट येथील बरॅक क्रमांक 10 मधील जागा (कक्ष क्रमांक एक आणि दोन मिळून सुमारे 700 चौरस फूट) दिली होती. या जागेवर यापूर्वी जनता दल (सेक्यूलर) पक्षाचे कार्यालय होते. प्रहारला जागा दिल्यावर जनता दलाला केवळ 200 चौरस फूट जागा ठेवण्यात आली होती.
- 2024 च्या निवडणुकीपूर्वी बच्चू कडू यांनी महायुतीशी आपले नाते तोडले आणि सरकारविरोधी भूमिका घेतली. या पार्श्वभूमीवरच राज्य सरकारने प्रहारचे कार्यालय काढून घेण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. आता ही जागा पुन्हा पूर्णपणे जनता दलाला देण्यात येणार आहे. शिवाय राज्य सरकारने प्रहारला पर्यायी जागा देखील दिलेली नाही. सरकारच्या या ‘अन्यायकारक’ निर्णयाविरुद्ध प्रहार पक्ष मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


