मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत अंतर्गत वाद पेटला आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपामध्ये युतीच्या मुद्द्यावरून जोरदार शाब्दिक चकमक उडाली आहे.
शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी कल्याण येथील एका कार्यक्रमात भाजपाला थेट आव्हान देत म्हटले, “काम न करता निवडणूक जिंकण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांना आम्ही आडवे करू. युती झाली तर ठीक, नाहीतर स्वबळावर लढू.” त्यांनी शिवसैनिकांना प्रत्येक प्रभागात धनुष्यबाण निवडून आणण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन केले.
याला प्रत्युत्तर देताना भाजपाचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी मोरे यांच्यावर पलटवार केला. ते म्हणाले, “मोरे यांनी आडवे पाडण्याची भाषा करू नये. मागील निवडणुकीत आमच्या सचिन खेमाणी यांनी त्यांना पराभूत केले होते. प्रसिद्धीसाठी ते काहीही बोलतात. युतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल.” परब यांनी युती न झाल्यास स्वबळावर लढण्याची भाजपाची ताकद असल्याचा दावा केला.
दरम्यान, मनसेचे माजी नगरसेवक मनोज घरत यांनी या वादावर टीका करताना म्हटले, “भाजप-शिवसेना युतीच्या चर्चेने जनतेचे लक्ष विचलित करत आहेत. गेल्या 25-30 वर्षांपासून केडीएमसीवर या पक्षांची सत्ता आहे, पण रस्त्यावरील खड्डे, धूळ आणि सर्पदंशासारख्या दुर्घटना कायम आहेत. सुज्ञ जनता या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवेल.”


