अहिल्यानगर : वृत्तसंस्था
वैद्यकीय तपासणीसाठी पुण्याकडे जात असताना अज्ञात वाहन धडकेत कार उलटून झालेल्या अपघातात सासरे आणि सुनेचा मृत्यू झाला तर दोन लहान मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. मृत दोघेही शेवगाव तालुक्यातील ठाकूर पिंपळगावचे रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मंगळवारी पहाटे निवडुंगे शिवारात हा अपघात झाला.
आसाराम लक्ष्मण निकाळजे (वय 70) आणि किरण बाळासाहेब निकाळजे (वय 38, दोघेही रा. ठाकूर पिंपळगाव, शेवगाव) अशी मृतांची नावे आहेत. स्वानंदा बाळासाहेब निकाळजे (वय 12) आणि स्नेहल बाळासाहेब निकाळजे (वय 6) अशी जखमी मुलींची नावे आहेत. त्यांच्यावर नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात बाळासाहेब आसाराम निकाळजे हे जखमी झाले होते. पायावर शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे. त्याच्या तपासणीसाठी बाळासाहेब यांना घेवून निकाळजे कुटुंब मंगळवारी पहाटे ओमनी कारने (एमएच 16,एबी 2116) पुण्याकडे निघाले होते. निवडुंगे गाव ओलांडल्यानंतर समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या कारला धडक दिली. या जोराच्या धडकेत ओमनी कार शेतात जावून उलटली.
या अपघातात उपचारासाठी निघालेले बाळासाहेब यांचे वडील आसाराम आणि पत्नी किरण यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात दोन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. कारचालक व बाळासाहेब यांनाही मार लागला आहे.
प्राथमिक उपचारानंतर बाळासाहेब व कारचालकास घरी सोडण्यात आले आहे. पाथर्डी पोलिसात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


