मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणातील ठाकरे बंधू गेल्या काही दिवसापासून एकत्र आल्याने मोठी चर्चा सुरु झाली आहे. आता पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज (दि.१२) दुपारी मातोश्रीवर दाखल झाले आहेत. ठाकरे कुटुंबीयांमध्ये स्नेहभोजनाचे आयोजन केल्याचे सांगितले जात असले तरी आजच्या भेटीत ठाकरे बंधूमध्ये राजकीय चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील चार महिन्यांतील ही पाचवी भेट आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा घेऊन राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झाले आहेत. तसेच भेट म्हणून तुळशीचे रोपही त्यांनी सोबत घेतले आहे. तर बऱ्याच वर्षांनी राज ठाकरे यांची आई मातोश्रीवर आल्या आहेत. महानगरपालिका निवडणुका काही तोंडावर आलेल्या आहेत. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची युती लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे बंधूमधील भेटीगाठी वाढलेल्या आहेत. दि. ५ ऑक्टोबररोजी राज ठाकरे हे मातोश्रीवर दाखल झाले होते. मागील चार महिन्यांत राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये ही पाचवी भेट असल्याने ठाकरे बंधुंच्या युतीबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
दिवाळीनिमित्त मनसेच्या वतीने शिवाजी पार्कवर दीपोत्सव केला जातो. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार का? या आधी मनसेच्या दीपोत्सवाला अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावली होती. त्यामुळं यावर्षी उद्धव ठाकरे आणि ठाकरेंचे नेते दीपोत्सवाला उपस्थित राहणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदीसह नेत्यांसह मराठी, हिंदी सिनेकलाकारांनी उपस्थिती लावली आहे. त्यामुळे आजच्या कौटुंबिक भेटीत याची चर्चा होते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


