नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील पश्चिम बंगालमधून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे एका वैद्यकीय विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. दोघे अजूनही फरार आहेत. ही घटना १० ऑक्टोबर रोजी रात्री ८ ते ९ च्या दरम्यान घडली. पीडिता तिच्या मित्रासोबत जेवण्यासाठी बाहेर गेली असताना तिच्यावर तीन तरुणांनी सामूहिक बलात्कार केला. कोलकातापासून १७० किमी अंतरावर असलेल्या दुर्गापूर येथील एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयासमोर ही घटना घडली. ओडिशातील एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी असलेली पीडिता सध्या एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी तिच्या मित्रासोबत जेवायला बाहेर गेली होती. कॅम्पसच्या गेटवर तीन तरुण उभे होते. त्यांनी पीडितेचा मोबाईल फोन हिसकावून घेतला आणि नंतर तिला केसांना धरून कॅम्पसच्या गेटसमोरील जंगलात ओढले. दरम्यान, पीडितेच्या मित्राने पळ काढला आणि पोलिसांना माहिती दिली. उपदंडाधिकारी आणि एसडीओ दुर्गापूर रंजना रॉय यांनी पीडितेची भेट घेतली. त्या म्हणाल्या, “विद्यार्थिनीची प्रकृती स्थिर आहे. तिची आई तिच्यासोबत आहे. पीडितेच्या पालकांनी मुलीच्या मित्रावर आणि त्याच्या मित्रांवर या घटनेत सहभागी असल्याचा आरोप केला आहे. पीडितेच्या मित्राला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली आहे.”
पोलिसांनी सांगितले की, घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज मिळवले जात आहे. मेडिकल कॉलेजच्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली जात आहे. ११ ऑक्टोबर रोजी पीडितेच्या पालकांनी दुर्गापूर न्यू टाउनशिप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. विद्यार्थिनीच्या वडिलांनी सांगितले, “मी कॉलेज चांगले आहे असे ऐकले होते, म्हणून मी माझ्या मुलीला येथे वैद्यकीय शिक्षणासाठी पाठवले. तिच्यासोबत असे काही घडेल अशी मी कधीच कल्पना केली नव्हती. येथे कोणतेही सुरक्षा उपाय नाहीत.” दरम्यान, राष्ट्रीय महिला आयोगाचे (एनसीडब्ल्यू) एक पथक आज दुर्गापूरमध्ये येणार आहे. भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री सुकांता मजुमदार म्हणाल्या की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालला बलात्कारी आणि गुन्हेगारांसाठी सुरक्षित आश्रयस्थान बनवले आहे.
काय सांगितले विद्यार्थिनीने
जेव्हा तीन जणांनी माझा रस्ता अडवला तेव्हा माझा मित्र मला एकटीला सोडून पळून गेला. त्यानंतर आरोपींनी माझा फोन हिसकावून घेतला आणि मला जंगलात नेले, जिथे तिघांनीही माझ्यावर बलात्कार केला. त्यांनी मला घटनेबद्दल कोणालाही सांगितले तर गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली आणि माझा मोबाईल फोन परत करण्यासाठी पैसे मागितले.


