मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढायच्या आहेत, जे लोक छळकपट करतात त्यांना रोखलं पाहिजे. तसेच युती होऊ नये असे त्यांना वाटत असेल तर त्यांच्यापासून सावध राहिले पाहिजे, असे विधान शिवसेनेचे नेते सामाज कल्याण विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांनी केले आहे. यामुळे चर्चांना उधाण आले असून महायुतीमध्ये अंतर्गत धूसफूस असल्याची जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. त्यांच्या विधानाचा रोख नेमका कोणाकडे होता याबाबत त्यांनी स्पष्ट संकेत दिलेले नाहीत.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. आत्तापासूनच इच्छुकांचे संधी मिळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्थानिक पातळीवर निर्णय पाहून निर्णय घेण्याची तयारी दर्शवली आहे.
परंतु, मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, महायुतीमध्ये सारे काही आलबेल असल्याचे चित्र दाखविण्यात आले तरी स्थानिक पातळीवर नेत्यांच्या वक्तव्यामुळे अडचणी येत असल्याची खंत शिरसाट यांनी बोलून दाखवली. त्यामुळे स्थानिक पातळीवर नेत्यांनी विधाने करताना किंवा जाहीरपणे वक्तव्य न करता ते थेट वरिष्ठांकडे आपले म्हणणे मांडावे असेही शिरसाट यांनी सांगितले.
एका न्यूज चॅनेलला दिलेल्या बाईटमध्ये संजय शिरसाट यांनी असे विधान का केले याबाबतचे कारण सांगितले. महायुतीमध्ये सर्व निवडणुका लढत असताना काही लोकांची मानसिकता अशी आहे की आपल्याला युती करायची नाही किंवा युती न करता आपल्या स्वतःचा स्वार्थ साधायचा, त्यांच्यासाठी दिलेला हा इशारा होता. असे शिरसाट म्हणाले.
हा त्यामागाचा हेतू होता.
जेव्हा आम्हाला शिंदे साहेबांनी आदेश दिलेला की महायुतीमध्ये लढायचं तर त्यावर इतरांनी काही कमेंट्स करणं योग्य नाही. खालच्या पातळीवरील काही नेते मग ते शिवसेनेचे असतील किंवा भारतीय जनता पार्टीची असतील किंवा मग राष्ट्रवादीचे असतील ते खालच्या खाली स्टेटमेंट देतात ते योग्य नाही. त्यांना सज्जड दम द्यावा हा त्यामागाचा हेतू होता, असे स्पष्टीकरण संजय शिरसाट यांनी केलेल्या विधानावर दिले.


