नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ज्येष्ठ मंत्र्यांना महायुतीची सत्ता आल्यानंतर नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. यामुळे अनेक नेत्यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवली नाही. परंतु राज्याच्या राजकारणात अनेक बड्या नेत्यांना मंत्रिमंडळातून डावल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा अधून मधून होतच असते.
भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होत होती. त्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर येत नाराज नसल्याची स्पष्ट भूमिका मांडली. परंतु, नुकतेच सुधीर मुनगंटीवार यांनी थेट दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. या प्रतिक्रेमुळे मुनगंटीवार यांना मोठी संधी मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना तसे संकेत देणारे विधान केले आहे.
“मी मंत्रीपदासाठी किंवा कोणतीही पदे मिळावीत म्हणून दिल्ली दौरा केलेला नाही. राज्यातील प्रश्न केंद्रापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानेच या भेटी घेतल्या आहेत.” असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. तसेच राज्यात काही ठिकाणी द्वेषाची भावना पसरवली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर मुनगंटीवार यांनी यावर लक्ष द्यायचे काम गृहमंत्र्यांचे आहे. गृहमंत्री ते काम करतील. असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले, मी मंत्रिमंडळात नाही यामागे पक्षाचे आणखी काही चांगले नियोजन असेल त्यामुळे ते होईल, असे सूचक विधान सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. यामुळे त्यांना लवकरच मोठी संधी मिळणार असून त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याच्या चर्चांना उधान आले आहे. अमित शाह यांची भेट सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील बांबू संशोधन संस्थेत तयार केलेला विशेष तिरंगा आणि डायरी भेट दिल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुधीर मुनगंटीवार यांनी अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचीही भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.


