जळगाव : प्रतिनिधी
भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरात बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगणाऱ्या एका रेकॉर्डवरील आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. कारवाई दरम्यान पोलिसांनी दोन गावठी पिस्तुल व एक जिवंत काडतूस असा सुमारे ५०,५०० रुपये किंमतीचा शस्त्रसाठा जप्त केला आहे.
ही कारवाई ८ ऑक्टोबर रोजी रात्री ११.३० वाजता वरणगाव येथील तिरंगा चौकात करण्यात आली. अटकेतील आरोपीचे नाव संजय गोपाळ चंडेले (वय ५०, रा. दर्यापुर शिवार, ऑर्डनन्स फॅक्टरी, वरणगाव) असे आहे. तो पूर्वीही आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्ह्यांमध्ये अडकलेला असून, वरणगाव पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध २०२२ मध्ये दोन गुन्हे नोंद आहेत. या संदर्भात जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी (भा.पो.से.) यांनी आगामी सण-उत्सव व निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील गुन्हेगारी आळा घालण्यासाठी कडक कार्यवाहीचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानीक गुन्हे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी ही माहिती मिळाल्यानंतर तत्काळ कारवाईचे आदेश दिले.
गोपनीय माहितीच्या आधारे स्था. गुन्हे शाखेचे पथक वरणगाव येथे रवाना झाले. संशयित संजय चंदेले यास तिरंगा चौकाजवळ झाडाजवळ उभे असताना पाहून त्याला ताब्यात घेण्यात आले. अंगझडती दरम्यान त्याच्याकडून दोन गावठी पिस्तुल व एक जिवंत काडतूस मिळाले.


