धरणगाव-प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील चांदसर शिवारात एका दारूच्या दुकानासमोर तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने गुरुवारी ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी मोठी खळबळ उडाली. गावठी हातभट्टीची दारू पिल्यानेच हा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप करत, संतप्त नातेवाईकांनी दारू विक्रीच्या दुकानाची तोडफोड आणि जाळपोळ केली.
हिरालाल अशोक सोनवणे (वय ३७, रा. चोरगाव, ता. धरणगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास हिरालाल यांचा मृतदेह चांदसर शिवारातील दारूच्या दुकानाजवळ आढळला. ही माहिती मिळताच मयताचे नातेवाईक आणि ग्रामस्थ घटनास्थळी जमले. मृतदेह पाहून नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला.
त्यानंतर विषारी गावठी दारूमुळे हिरालालचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करत, संतप्त जमावाने दारू विक्री करणाऱ्या हॉटेल वर हल्ला चढवला. त्यांनी दगडफेक करून हॉटेलची मोठी तोडफोड केली, तसेच हॉटेलच्या काही भागाला आग लावली व त्याठिकाणी उभा असलेल्या पाण्याच्या टँकर देखील आग लावली आहे. नातेवाईकांनी यावेळी दारू विक्रेत्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची आग्रही मागणी केली आहे.
या घटनेमुळे चांदसर परिसरात अत्यंत तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पवार, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत खंडारे, उपनिरीक्षक पवार यांच्यासह पोलीस पथक आणि फॉरेन्सिक लॅबचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तणाव कमी करून परिस्थिती नियंत्रणात आणली. मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय याठिकाणी नेण्यात आला आहे व पोलीस घटनेचा तपास करत आहेत.


