मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला पोलिसांचा अहवाल डावलून शस्त्र परवाना मंजूर करण्यात आला. याप्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची ताबडतोब मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केली आहे. नुकतेच पत्रकार परिषदेत अनिल परब यांनी योगेश कदमांनी कशाप्रकारे नियम डावलून सचिन घायवळ याला शस्त्र परवाना मंजूर केला, याबाबतची माहिती उघडून सांगितली आहे.
अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत म्हणाले की, “गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी गुंडाचा भाऊ असलेल्या व्यक्तीला अधिकृत शस्त्र परवाना दिला. पोलिसांनी हा परवाना नाकारला. पोलिसांनी त्यांचे काम चोख केले होते. परंतु योगेश कदमांनी पुणे पोलीस आयुक्तांचे आदेश रद्द केले. पुणे जिल्ह्यात ७० टोळ्या सक्रीय आहेत. निलेश घायावळचा भाऊ सचिन घायावळ याच्यावर खंडणी, खूनासारखे गंभीर गुन्हे आहेत. पोलिसांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता सचिन घायावळ याला शस्त्र परवाना नाकारला परंतु गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी पत्र लिहून हा शस्त्र परवाना मिळवून दिला. योगेश कदमांनी कुठल्या मोबदल्यात त्याला शस्त्र परवाना मिळवून दिला?” असा सवाल अनिल परब यांनी केला.
“गँगस्टरच्या हातात अधिकृत शस्र परवाना देण्याचं काम गृह राज्यमंत्री करतायेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नेमकी अडचण काय? अशा मंत्र्यांना सोबत घेऊन स्वत:ची प्रतिमा मलिन का करतायेत हे कळत नाही. योगेश कदम यांची ताबडतोब मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा. अधिवेशनात आम्ही आवाज उचलू मात्र योगेश कदम यांची हकालपट्टी केल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही. लोकांच्या सुरक्षेची सरकारला काही पडली नसेल परंतु विरोधी पक्ष म्हणून आम्ही रस्त्यावर उतरू,” असा इशारा आमदार अनिल परब यांनी दिला आहे.
राज्य सरकारमधील हे मंत्री आईच्या नावाने डान्सबार चालवतायत, मुली नाचवून हे लोक भाडं खात आहेत, गँगस्टर लोकांना पोसत आहेत. हे मंत्री गुंडांना अधिकृत शस्त्र परवाना देत आहेत. हे मंत्री दररोज मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेवर चिखलफेक करत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांची काय अडचण आहे की, ते अशा मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून का बसले आहेत?, असा सवालही अनिल परब यांनी उपस्थित केला.


