जळगाव : प्रतिनिधी
जळगावातील बोगस कॉल सेंटरमधून ज्या विदेशी नागरिकांची फसवणूक झाली व त्यांनी त्या-त्या देशात तक्रार दिली असेल, त्याची माहिती संकलित केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणात माजी महापौर ललित कोल्हे (रा. कोल्हे नगर) व राकेश चंदू अगारिया (रा. वाघ नगर) या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यांची नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
नामांकीत कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचे सांगण्यासह वेगवेगळे आमिष दाखवून इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, युरोप यासह अन्य देशांमधील नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या जळगावातील बनावट कॉल सेंटरवर जळगाव पोलिसांनी २८ सप्टेंबर रोजी छापा टाकला होता. यामध्ये पोलिसांनी विविध मुद्द्यांवर माहिती संकलित केली असून, एकूण फसवणुकीचा आकडा व फसवणूक झालेल्यांची माहिती घेतली जात आहे.
जळगावातील हे केंद्र मुंबईतून हाताळणाऱ्या आदील सैयद निशार, अकबर खान, ऋषी उर्फ केशव राजू बेरिया (सर्व रा. मुंबई) हे तिघे जण पोलिसांना हवे आहेत. त्यांच्या शोधासाठी गेलेले पोलिस पथक परतले आहे. हे तिघेही विदेशात पळून जाऊ नये, यासाठी पोलिसांकडून त्यांच्या पासपोर्ट क्रमांकाची माहिती घेणे सुरू होते. त्यात अकबर खान व ऋषी बेरिया या दोघांच्या पासपोर्टचे क्रमांक मिळाले आहे. त्यामुळे मंगळवारी (७ ऑक्टोबर) त्यांच्याविरुद्ध लूक आऊट सर्व्हिस नोटीस काढण्यात आली. तर आदीलचा पासपोर्ट क्रमांक मिळविणे सुरू आहे. देशातील सर्व विमानतळांना याविषयी माहिती देण्यात आल्याने ते विमानतळावर पोहोचताच अॅलर्ट मिळणार आहे. अकबर, आदील, इम्रान यांच्या पार्सपोट इमिग्रेशनवरील स्थिती पाहिली तर सध्या देशातच आहे. या तिघांपैकी अकबर हा या पूर्वी दुबई येथे जाऊन आल्याचीही माहिती समोर आली.
जळगाव पोलिस अकबर, आदील व ऋषी या तिघांच्याही मुंबई येथील घरी पोहोचले. यातील अकबर व आदील यांचे घर बंद होते. तर ऋषीच्या घरी त्याची बहीण व अन्य कुटुंबीयांची भेट झाली. त्यांना ऋषीविषयी कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. या प्रकरणात ललित कोल्हे व राकेश अगारिया यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना पोलिस कोठडीचा हक्क राखून पोलिसांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली. न्यायालयाने दोघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. जळगाव कारागृहात जागा नसल्याने दोघांनाही नाशिक कारागृहात हलविण्यात आले.


