जळगाव : प्रतिनिधी
गेल्या अनेक दिवसांपासून हाताला काम मिळत नव्हते. त्यामुळे ज्या दुकानातून काम करीत होताच त्याच दुकानातून १४ लाखांचे १२४ ग्रॅम सोने चोरले. चोरी केल्यानंतर हैदराबादला पळून जाण्यापुर्वीच संशयित बिस्वजीत बनेस्वर सासमल (रा. पश्चिम बंगाल) या कारागिरला तांत्रिक विश्लेषणावरुन शनिपेठ पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून चोरलेले १२४ ग्रॅम सोन्याची लगड हस्तगत केल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील बालाजी पेठेत निखिल कैलास गौड (वय ३०, रा. पश्चिम बंगाल) यांचे लक्ष्मीनारायण ज्वेलर्स नावाने सोन्याचे दागिने घडविण्याचे दुकान आहे. त्या दुकानात बिस्वजीत सासमल हा पश्चिम बंगाल येथील कारागिर गेल्या अनेक दिवसांपासून काम करीत होता. दि. ३ रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास दुकानाचे कुलूप तोडून कारागिर सुदर्शन माल यांचे काम करण्याचे ड्रॉवरचे कुलूप तोडून तेथून १२४ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरुन नेले होते. याप्रकरणी शनिपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता शनिपेठ पोलिसांनी परिसरातील सीसटीव्ही फुटेजची तपासले असता, त्यामध्ये संशयित कारागिर बिस्वजीत सासमल हा चोरी करुन संशयास्पदरित्या आढळून आला.
संशयित बिस्वजीत त्याची पोलीस कोठडीत कसून चौकशी केल्यानंतर त्याने १३ लाख ९९ हजार रुपये किंमतीचे चोरलेले १२४ ग्रॅम सोन्याची लगड यासह चोरी करण्यासाठी लागणारे साहित्य काढून दिले. तो मुद्देमाल शनिपेठ पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई शनिपेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि साजीद मंसूरी, उपनिरीक्षक योगेश ढिकले, पोहेकों अल्ताफ पठाण, प्रदीप नन्नवरे, योगेश जाधव, योगेश साबळे, निलेश घुगे, अमोल वंजारी, नवजीत चौधरी यांच्यासह गौरव पाटील यांच्या पथकाने केली


