छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
राज्यातील मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची गरज असून निर्णय घेण्यात सरकार विलंब करत आहे. मराठवाड्यात सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. या आत्महत्या नसून खून आहेत. हे सरकारचे पाप असल्याची टीका सोमवारी (दि.६) शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली. भोकरदन येथे शेतकरी आक्रोश मोर्चासाठी रवाना होण्यापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी शिंदे म्हणाले की, शिवसेना ठाकरे गटाकडून शेतकऱ्यांवरील प्रश्नावर छत्रपती संभाजीनगरमध्ये मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे आमच्या पक्षाकडून येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले नाही. दरम्यान अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. ऑगस्टपासून महाराष्ट्रात पाऊस सुरू आहे. अजूनही काही ठिकाणी पंचनामे सुरू आहेत, मात्र मदत जाहीर करण्यात सरकारकडून विलंब होत आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी मदतीसाठी प्रस्ताव पाठवा असे म्हटले आहे. म्हणजेच अजून महाराष्ट्राकडून प्रस्ताव दिल्लीला गेलेला नाही. शेतकऱ्यांना आत्ता तातडीने मदत मिळणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
तसेच ऑनलाइन पंचनाम्याच्या सूचना आहेत. मात्र अनेक भागात नेटवर्कच नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. राज्य सरकारने पाच हजारांची मदत जाहीर केली. ती तोकडी असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. तर शेतकऱ्यांकडून १५ रुपये आकारण्यापेक्षा कारखान्यांकडूनच ती रक्कम घ्यावी, शेतकऱ्यांवर अधिक आर्थिक भार टाकणे योग्य नाही असेही शिंदे यावेळी म्हणाले. तसेच साखर दर आणि वीज बिलाबाबत बोलताना त्यांनी राज्यातील सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची अपेक्षा व्यक्त केली.


