मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शिंदेंच्या शिवसेनेतील नेते रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यू बाबत शंका उपस्थित केल्यानंतर आता उद्धव ठाकरे आक्रमक झाले असून त्यांनी देखील रामदास कदम यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. मी गद्दार, नमकहराम व हरामखोरांना उत्तर देत नाही, अशा कडवट शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांची टीकेला प्रत्युत्तर देणे टाळले आहे. मी गद्दार व नमकहारांना उत्तर देत नाही. मला ते देण्याची गरज वाटत नाही. ठाकरे म्हणजे काय? हे संपूर्ण महाराष्ट्र व देश ओळखतो. त्यामुळे मी त्या गद्दाराला व हरामखोराला उत्तर देणार नाही, असे ते म्हणालेत.
उद्धव ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी तेथील पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी दसरा मेळावा, भारत-पाक संबंध, हिंदुत्व, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची धोरणे, रामदास कदम यांची टीका आदी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, कालचा दसरा मेळावा अभूतपूर्व झाला. हे केवळ माझे श्रेय नाही. पावसामुळे शिवाजी पार्कवर चिखल झाला होता. तळे झाले होते. पण त्याही स्थितीत केवळ मुंबईचाच नव्हे तर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील शिवसैनिक आले होते. त्यांनी स्वतःची चटणी भाकरी आणली होती. आपल्याकडे बिर्याणी वगैरेची काही सोय नाही. जे येतात ते स्वकष्टाचे येतात. पाऊस पडत असतानाही कुणीही जागचे हलले नाहीत. शिवाजी पार्कला दरवाजे नाहीत. बांधावरून उडी मारली की माणूस बाहेर जाऊ शकतो. त्यामुळे आलेल्या लोकांना कोंडून ठेवण्याची गरज आम्हाला वाटत नाही. जी इतरांना कदाचित वाटत असेल, असे ते एकनाथ शिंदेंवर निशाणा साधताना म्हणाले.
ते पुढे म्हणाले, शिवसेनेचा 1966 मध्ये पहिला दसरा मेळावा झाला. मी 6 वर्षांचा होतो. तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी शिवाजी पार्कवर तो घेण्याचा निर्णय घेतला. त्यावर काहींनी एवढे मोठे मैदान भरेल का? अशी शंका घेतली. त्यांनी हॉल किंवा दुसऱ्या एखाद्या छोट्या मैदानात सभा घेण्याचा प्रस्ताव ठेवला. पण बाळासाहेबांनी ही सभा शिवाजी पार्कवरच घेण्यावर ठाम राहिले. मी वेडा की लोकं वेडी हे पाहून घेऊ, असे ते तेव्हा म्हणाले होते. आता हे दोघेही वेडे नव्हते हे स्पष्ट झाले आहे. हा प्रवास आजही सुरू आहे. त्यामुळेच पाऊस सुरू असतानाही लोकं जागचे हलले नाही.
आपल्या देशाला आता पंतप्रधान, गृहमंत्री व अख्ख्या मंत्रिमंडळाची गरज आहे. आत्ता जे बसलेत ते एका पक्षाचे मंत्री बसलेत. ते देशाचे नाहीत. देशाचे म्हणून कारभार कुठे सुरू आहे. सोनम वांगचुक यांनी काय गुन्हा केला? की थेट त्यांच्यावर रासुका लावण्यात आला. त्यांनी एवढे मोठे राष्ट्रविघातक त्यांनी कोणते काम केले? काल परवापर्यंत ते पंतप्रधानांची स्तुती करत होते. तेव्हा ते देशप्रेमी होते. पण नंतर काय घडले? सोनम वांगचुक यांनी चूक केली असेल, तर मणिपूरमध्ये कुणी चूक केली? लेह, लडाखमध्ये काय स्थिती आहे? तेथील परिस्थिती शांत झाली आहे का? आसाममध्ये आदिवासी रस्त्यावर उतरलेत. त्यांच्या हातात मशाली आहेत. पण दुर्दैवाने त्याची एकही बातमी येत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
ते पुढे म्हणाले, मी माझ्या परीने काम करण्याचा प्रयत्न करत आहे. ते करत राहणार. याला आमची घराणेशाही म्हणा किंवा घराण्याची परंपरा म्हणा. जिथे जिथे अन्याय दिसेल त्याला लाथ मार असे माझ्या आजोबांनी शिकवलेले ब्रिदवाक्य आहे. हे माझ्या वडिलांनी आयुष्यभर पाळले. तेच घेऊन मी पुढे जात आहे. त्यामुळे अन्याय दिसेल तिथे लाथ मारणे हे आमचे कामच आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, हे लोक हिंदुत्व सोडल्याचा आरोप करत आमच्या अंगावर येतात. पण त्यांनी त्यांच्याच वंशावळी पाहून कुणी काय सोडले हे पहावे. आम्ही भाजपसोबत होतो तेव्हा कडवट हिंदुत्ववादी होतो. मग आम्ही भाजपला सोडले म्हणजे हिंदुत्व सोडले का? आम्ही भाजपला सोडले म्हणून हिंदुत्व सोडले असे असेल, तर मग सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाला 100 वर्षे पूर्ण झाल्यानंतर लागलेली विषारी फळे हेच त्याचे फलित आहे का? हे सांगावे. कारण, स्वतः मोहन भागवत मशिदीत जातात. भाजप अल्पसंख्यकांना सदस्यत्व देते. त्यांना सौगात ए मोदी देते. पण आम्ही काँग्रेससोबत गेलो तर हिंदूत्व सोडले. तुम्ही सौगात ए नेहरू कधी पाहिले का? सौगात ए इंदिरा गांधी कधी ऐकले का? मग सौगात ए मोदी वाटणारे हिंदुत्ववादी कसे?
तुमच्या राज्यात हिंदू असुरक्षित आहेत. ज्यांनी हिंदूंना मारले त्या पाकसोबत तुम्ही क्रिकेट मॅच खेळू कशी शकता? आम्ही काँग्रेससोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडले, तर मग तुम्ही चंद्राबाबू नायडूंसोबत गेलात, ते नायडू हिंदुत्ववादी आहेत का? असे विविध प्रश्न उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपवर शरसंधान साधताना उपस्थित केले. भाजपने जे केले अमर प्रेम आणि इतरांनी केले तर ते लव्ह जिहाद, असे कसे असू शकते? असे ठाकरे म्हणाले.


