मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी इलेक्ट्रॉनिक नो योर कस्टमर (ई-केवायसी) सत्यापन अनिवार्य केले आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. परंतु अनेक महिलांना केवायसी करण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत लाडकी बहीण योजनेतील महिलांना दिलासा दिला आहे. त्यांनी ईकेवायसीमधील तांत्रिक अडचणी दूर करण्यात येतील, असे आश्वासन दिले आहे.
आदिती तटकरे काय म्हणाल्या?
मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे E-KYC करताना OTP बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. महिला व बालविकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून, तज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपायोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन E-KYC प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होणार याबाबत मी सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त करते,’ असं आदिती तटकरेंनी म्हटलं.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. या ई केवायसी प्रक्रियेत या योजनेतील लाभार्थ्यांच्या सोबतच पती किंवा वडिलांची ई केवायसी करणं बंधनकारक करण्यात आले आहे. लाडकी बहीण योजनेसाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावा अशी मुख्य अट आहे. अनेक पात्र झालेल्या महिलांचे उत्पन्न कमी आहे, मात्र लग्न झालं असेल तर पतीचं आणि लग्न झालं नसेल तर वडिलांचं उत्पन्न याचीही चौकशी केली जाणार आहे.



