मुंबई | प्रतिनिधी लाईव्ह महाराष्ट्र न्युज
राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागातर्फे दिनांक ६ ऑक्टोबर २०२५ रोजी नगराध्यक्ष पदाच्या आरक्षण सोडतीसाठी बैठक घेण्यात येणार आहे. ही बैठक मुंबई मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात पार पडणार आहे.
या बैठकीसाठी राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे दोन प्रतिनिधी उपस्थित राहणार असून, त्यांना औपचारिक पत्र देण्यात आले आहे. नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी यांनी या संदर्भातील पत्रक सर्व पक्षांच्या अध्यक्षांना पाठवले आहे.
राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण या सोडतीद्वारे निश्चित करण्यात येणार आहे. त्यामुळे या पदाच्या रेसमध्ये असलेल्या उमेदवारांसाठी ही बैठक अत्यंत निर्णायक ठरणार आहे. विविध पक्षांचे स्थानिक नेतृत्व आणि कार्यकर्ते आता यासाठी सज्ज झाले असून, काही ठिकाणी रणनीती बैठका सुरू झाल्याचेही कळते.
राजकीय वर्तुळात यामुळे मोठी हालचाल सुरु झाली असून, कोणत्या समाजघटकाला किती संधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी आरक्षणाचे गणित महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे ही सोडत राज्याच्या राजकारणातही मोठा प्रभाव टाकण्याची शक्यता आहे.


