मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने आयोजित केलेल्या एका मेळाव्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत कठोर शब्दात टीका करण्यात आली. शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी देखील काही धक्कादायक वक्तव्य केली होती. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या वारसा आणि मृत्यूच्या संवेदनशील मुद्द्यावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करत, राजकीय वातावरण ढवळून काढले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन कधी झाले, मृत्युपत्र कोणी केले व सही कोणाची घेतली याबाबत माहिती घ्यावी, अशी मागणी रामदास कदम यांनी उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे या मेळाव्यात केली.
कदम म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पार्थिव किती दिवस ठेवले, याबाबत त्यांच्यावर उपचार करणार्या डॉक्टरांकडून माहिती घ्यावी.माझ्या माहितीप्रमाणे निधन झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या हाताचे ठसे घेतले. तत्पूर्वी मी आठ दिवस मातोश्रीमधील बाकड्यावर आठ दिवस झोपलो होतो. त्यांचे पार्थिव दोन दिवस ठेवले होते, असा गंभीर आरोपही कदम यांनी केला. बाळासाहेबांच्या राजकीय आणि वैयक्तिक वारसा हक्कावरून निर्माण केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवे वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
रामदास कदम यांनी आपल्या भाषणाची धार वाढवत, उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले. त्यांनी प्रश्न केला की, “उद्धव ठाकरे यांना राजकीय दृष्ट्या बाळासाहेब यांचे नाव घेता येईल का?” तसेच, उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांना ‘मावळे’ संबोधण्याऐवजी ‘डोमकावळे’ असे हिणवत, त्यांनी ठाकरे गटाच्या निष्ठा आणि राजकीय भूमिकेवर थेट हल्ला केला. विशेष म्हणजे, त्यांनी मराठी माणसाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. “मराठी माणूस मुंबईच्या बाहेर गेला, हे पाप उद्धव ठाकरे यांचे आहे,” असा गंभीर आरोप करत, मुंबई महानगरपालिकेतील त्यांच्या दीर्घकाळच्या सत्तेकडे त्यांनी लक्ष वेधले.


