जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एका तरुण नोकरदाराला एका अज्ञाताने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट कार्ड विभागातून बोलत असल्याचे भासवून १ लाख ३२ हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना १ ऑक्टोबर, बुधवारी उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, फिर्यादीने आरोपीला कोणतीही माहिती दिली नसतानाही ही फसवणूक झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, निमखेडी रोड, शिवधाम मंदिर परिसरात राहणारे प्रणेश प्रकाश ठाकुर (वय-३४) यांनी फिर्याद दिली आहे. २५ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३८ वाजता ही घटना घडली. फिर्यादी प्रणेश ठाकुर यांना ८७२००६७३०७ या मोबाईल क्रमांकावरून एका व्यक्तीचा कॉल आला. कॉल करणाऱ्याने आपण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट कार्ड विभागातून बोलत असल्याचे सांगत फिर्यादीकडे त्यांच्या क्रेडिट कार्डासंबंधी काही माहिती विचारण्याचा प्रयत्न केला.
प्रणेश यांनी आपली कोणतीही गोपनीय माहिती त्या व्यक्तीला दिली नाही. असे असतानाही, संशयिताने क्रेडिट कार्डमधून १ लाख ३२ हजार रुपयांची रक्कम काढून घेतली आणि त्यांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


