नागपूर : वृत्तसंस्था
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) स्थापनेला 100 वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्त यंदाचा दसरा मेळावा खास असणार आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे या दसरा मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही सरसंघचालक मोहन भागवत हे दसरा मेळाव्याच्या निमित्त मार्गदर्शन करत आहेत.
भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी आज महात्मा गांधी यांची जयंती आहे, महात्मा गांधी यांचं स्वांतत्र्य लढ्यातील योगदान अतुलनीय असल्याचे म्हंटले आहे. आज माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांचीही जयंती आहे. भागवत यांनी त्यांचेही स्मरण केले. संघप्रमुख म्हणाले की, ज्यांनी देशासाठी आपले प्राण अर्पण केले, अशा लाल बहादुर शास्त्री यांची आज जयंती आहे. भक्ती, देशसेवा आणि समर्पण यांचे ते उत्कृष्ट उदाहरण आहेत. याशिवाय त्यांनी तरुण उद्योजक, अमेरिकेन टॅरिफ धोरण, अतिवृष्टी यासारख्या विषयांवर भाष्य केले.
“अमेरिकेने त्यांच्या हितासाठी टॅरिफ धोरणं आणलं आहे. आपल्याला स्वदेशीवर भर द्यावा लागेल, आर्थिक क्षेत्रात भारत आघाडीवर आहे, आपल्याला आत्मनिर्भर व्हावे लागेल. आपल्याला आत्मनिर्भर व्हावं लागेल. स्वदेशी स्वीकारावं लागेल. अमेरिकेने त्यांच्या हितासाठी टॅरिफ आणलं त्याचा फटका सर्वांना बसतो आहे. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय संबंध जोपासणं आपलं कर्तव्य आहे. आर्थिक दृष्ट्या भारत आघाडीवर आहे. तरुण उद्योजकांमध्ये उत्साह आहे,” असे मोहन भागवत म्हणाले.
“हिंसक मार्गाने परिवर्तन होत नाही. आज समाज अराजकतेकडे जातो की काय असतं वाटतं आहे. स्वत: ला बदलल्याशिवाय परिवर्तन होणार नाही. व्यक्ती निर्माणातूनच समाज निर्माण होत. व्यक्तीत बदल झाला तर समाज बदलेल. भाषण किंवा पुस्तकातून समाज बदलत नाही. पहलगाममध्ये धर्म विचारून निष्पाप लोकांवर गोळ्या झाडल्या. दहशतवादी हल्ल्यानंतर देशात संतापाची लाट उसळली. आपल्या सैन्याने दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. यावेळी भारताचे मित्र कोण आणि शत्रू कोण हे स्पष्ट झाले,” असेही मोहन भागवत म्हणाले.


