जळगाव : प्रतिनिधी
जळगाव-चोपडा मार्गावरील तापी नदीवरील विदगाव पुलावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव डंपरने कारला दिलेल्या भीषण धडकेत आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला असून, वडील आणि दुसरा मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना रविवारी (३० सप्टेंबर) रात्री उशिरा घडली. चौधरी कुटुंब कारमधून चोपडा येथे जात असताना मागून आलेल्या डंपरने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. धडकेमुळे कार पुलावरून थेट खाली नदीपात्रातील वाळवंटात जाऊन कोसळली.
या अपघातात मीनाक्षी निलेश चौधरी (वय ३५) आणि त्यांचा सात वर्षीय मुलगा पार्थ यांचा जागीच मृत्यू झाला. निलेश चौधरी आणि दुसरा मुलगा ध्रुव हे गंभीर जखमी असून, त्यांच्यावर जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मयत मीनाक्षी चौधरी या जळगाव येथील शिक्षिका होत्या, तर त्यांचे पती निलेश चौधरी हे धानोरा येथील शिक्षक आहेत. त्यांच्या कुटुंबावर आलेल्या या दुर्दैवी प्रसंगामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.घटनेची माहिती मिळताच यावल पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय गायकवाड आणि त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातस्थळी मदतकार्य करत जखमींना रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, अपघात करणाऱ्या डंपरविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरमुळे सातत्याने अपघात घडत असून, या बेकायदेशीर वाहतुकीवर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी आता नागरिकांकडून होत आहे.


