जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरात अवैधपणे सुरू असलेल्या गॅस भरण्याच्या धोकादायक व्यवसायामुळे मोठा अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. शहरातील एका ठिकाणी चारचाकी वाहनामध्ये गॅस भरत असताना सिलेंडरचा जोरदार स्फोट झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली.
सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र संबंधित चारचाकी वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. स्फोटामुळे आजूबाजूच्या इमारतींच्या भिंती हादरल्या असून, नागरिकांनी भीती व्यक्त केली आहे.घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात हे गॅस भरण्याचे काम पूर्णपणे बेकायदेशीर पद्धतीने सुरू असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी संबंधित दुकानदार व वाहनधारकावर तात्काळ कारवाई केली असून दोघेही अनेक दिवसांपासून हा अवैध व्यवसाय करत असल्याचे उघड झाले आहे.
या घटनेमुळे जामनेर शहरात सुरू असलेल्या अवैध गॅस भरण्याच्या व्यवसायावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी पोलिस प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्थेवर दुर्लक्ष केल्याचा आरोप करत, भविष्यातील अपघात टाळण्यासाठी कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी शहरातील इतर भागांतही अशा प्रकारे सुरू असलेल्या गॅस भरणीच्या ठिकाणांचा शोध घेण्यास सुरुवात केली असून, अशा बेकायदेशीर व्यवसायांना आळा घालण्यासाठी विशेष मोहिम राबवली जाणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.


