मुंबई : वृत्तसंस्था
येत्या विजयादशमीला अगदी काही दिवस शिल्लक राहिले असून याच दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण होणार आहेत. अशातच काँग्रेसच्या प्रदेशाध्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जहरी टीका केली आहे. संघाला अनुरोध आहे की तुम्ही शंभराव्या वर्षात फेल झालेला आहात. तुमचा संघ विसर्जित करा, नाहीतर मनुस्पुर्तीची होळी करा असा खळबळजनक सल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.
पुढे ते म्हणाले, संविधान स्वीकारा किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात गांधींचा फोटो लावा असाही सल्ला सपकाळ यांनी दिला आहे. गांधीच्या तत्वज्ञानाचा विरोध म्हणून तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली असल्याचा गंभीर आरोपही हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. नागपुरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी संघाच्या विचारसरणीवर जोरदार टीका केली.
संघाला १०० वर्ष पूर्ण होत आहेत आणि याच दिवशी गांधी जयंती आहे. हा एक योगायोग नाही तर एक संदेश आहे. गांधीजींच्या पुतळ्यासमोर उभे राहून संघाने नथुराम गोडसेंच्या विचारसरणीपासून दुरावा घेतला पाहिजे. गांधींच्या मार्गाचा स्वीकार करूनच एकात्मतेचा खरा मार्ग सापडू शकतो. नथुराम गोडसे हा खुनी होता, दहशतवादी होता. त्याचा स्वातंत्र्यलढ्यात किंवा राष्ट्र उभारणीत काहीही सहभाग नव्हता, असंही सपकाळी म्हणाले.
संघाचा स्वातंत्र्यलढ्याशी काहीही संबंध नव्हता. त्यांना इंग्रजांची व्यवस्था मान्य होती, असा खळबळजनक आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. संघाला १०० वर्ष पूर्ण होताना त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. संघाने आपल्या प्रवासाला पूर्णविराम देऊन एकतेच्या विचारांना मान्यता दिली पाहिजे. नाहीतर मागे गांधी आणि समोर नथुराम अशा प्रकारचे जे आरोप होत आहे ते सत्यात येईल, असे म्हणत हर्षवर्धन सपकाळ यांनी संघाला लक्ष्य केले.


