जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील दापोरा गावावर एक शोककळा पसरवणारी दुर्दैवी घटना गुरुवारी सकाळी घडली. स्वतःच्या घराचे स्वप्न उरात बाळगून काम करणाऱ्या ३० वर्षीय मयूर काळे या तरुणाचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाल्याने काळे कुटुंबासह संपूर्ण गाव हळहळून गेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयूर किशोर काळे (वय ३०) हा शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याच्या परिवारात आई-वडील, भाऊ, पत्नी व एक लहान मुलगी आहे. आपल्या कुटुंबासाठी स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने मयूर गुरुवारी (२५ सप्टेंबर) सकाळी १० वाजेच्या सुमारास बांधकामस्थळी गेला होता. काम सुरू असताना अचानक विजेचा जोरदार धक्का बसून तो जमिनीवर कोसळला.
शेजारील तरुणांनी प्रसंगावधान राखत त्याला तत्काळ जळगाव येथील शासकीय रुग्णालयात हलवले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. या बातमीने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. वडील आणि भावाने रुग्णालयात हंबरडा फोडला. या घटनेची नोंद जळगाव तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. कर्त्या आणि प्रेमळ मुलाचा अचानक जाण्याने काळे कुटुंब पूर्णपणे कोलमडून गेले असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. मयूरच्या जाण्याने एक जबाबदार पती, मुलीचा आधारवड, आणि कुटुंबाचा कणा हरपला गेला आहे.


