मुंबई : वृत्तसंस्था
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यावर टोलच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. गडकरी यांनी टोलच्या माध्यमातून जनतेचा पैसा त्यांच्याशी संबंधित कंपन्यांमध्ये वळवला असून, त्यांच्या दोन्ही मुलांच्या कंपन्यांना याचा थेट फायदा झाला असल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे. या आरोपांना भारतीय जनता पक्षाने (भाजप) तथ्यहीन आणि बदनामीसाठी केलेले जुने आरोप असल्याचे सांगत फेटाळून लावले आहे.
दमानियांचे आरोप काय?
अंजली दमानिया यांनी गडकरींवर टोल व्यवस्थापन आणि रस्ते बांधणीच्या कंत्राटांमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. त्या म्हणाल्या, “नागरिक रोड टॅक्स, सेल्स टॅक्स, जीएसटीसारखे कर भरत असताना टोल का लादला जातो? टोलमधून मिळणारा पैसा ‘आयडीएल’ नावाच्या कंपनीत गेला आणि तिथून तो गडकरी यांच्या दोन्ही मुलांच्या कंपन्यांमध्ये हस्तांतरित झाला.” दमानिया यांनी गडकरी यांना ‘एक्सप्रेस वे मॅन ऑफ इंडिया’ म्हणत त्यांच्यावर प्रत्येक किलोमीटर रस्त्याच्या कामामागे आणि टोलमधून पैसे खाल्ल्याचा आरोप केला. तसेच, सरकारच्या बिल्ड ऑपरेटर ट्रान्सफर (बीओटी) आणि टोल ऑपरेटर ट्रान्सफर (टीओटी) मॉडेल्सवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
दमानिया यांनी पुढे दावा केला की, त्यांच्याकडे १२८ कंपन्यांशी संबंधित माहिती आहे, ज्यामध्ये गडकरी यांच्या कंपन्या थेट किंवा अप्रत्यक्षरित्या सहभागी आहेत. “ही माहिती उघड केली तर वर्षभर पुरेल इतका भ्रष्टाचार समोर येईल,” असे त्यांनी सांगितले. टोल आणि इथेनॉल उद्योगातील पारदर्शकतेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले असून, जनतेच्या पैशावर उभारलेले प्रकल्प खासगी कंपन्यांच्या फायद्यासाठी वळवले जात असल्यास हा स्पष्ट घोटाळा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
आरोप तथ्यहीन आणि बदनामीसाठी
भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दमानिया यांच्या आरोपांना तथ्यहीन आणि खोटे ठरवले आहे. ते म्हणाले, “हे आरोप २०१३ मधील जुने आहेत. तेव्हा कॉंग्रेस सरकारच्या यंत्रणांनी याची चौकशी केली होती, पण त्यात काहीही तथ्य आढळले नाही. केवळ बदनामीसाठी असे बेछूट आरोप केले जात आहेत.” उपाध्ये यांनी पुढे सांगितले की, अशा प्रकरणांना कायदेशीर आव्हान दिले जाऊ शकते, परंतु काही लोक फक्त बदनामीसाठीच असे आरोप करतात.


