जळगाव : प्रतिनिधी
धरणगाव तालुक्यातील वराड येथील १९ वर्षीय तरुण हर्षल राजू पाटील याचा शनिवारी, १९ जुलै रोजी सकाळी ६ वाजता नशिराबाद गावाजवळील टोलनाक्याजवळ झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. भरधाव डंपरने त्याच्या दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात घडला, तर हर्षलचा मित्र कुणाल गोकुळ पाटील (रा. वराड) गंभीर जखमी झाला. या घटनेप्रकरणी बुधवारी, २३ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात डंपरवरील अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षल पाटील हा आपल्या आई-वडील आणि बहिणीसोबत वराड गावात राहत होता. बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील जागृत मारुती मंदिरात दर शनिवारी जिल्ह्यासह बाहेरून अनेक भाविक दर्शनासाठी जातात. याच परंपरेनुसार, हर्षल पाटील आपल्या गावातील ८ ते १० मित्रांसोबत दुचाकी क्रमांक (एमएच १९ इजे ०००३) ने शनिवारी पहाटे शिरसाळ्याला दर्शनासाठी निघाला होता. त्याच्या दुचाकीवर त्याचा मित्र कुणाल पाटील हा होता.
सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास, नशिराबाद गावाजवळील टोलनाक्याजवळील पुलावरून जात असताना, एका भरधाव डंपर क्रमांक (एमएच १६ एइ ६४११) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत हर्षल पाटील जागीच ठार झाला, तर कुणाल पाटील गंभीर जखमी झाला. जखमी कुणालवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या संदर्भात नशिराबाद पोलीस ठाण्यात बुधवारी, २३ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता डंपरवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक ए. सी. मनोरे हे करीत आहेत.


