मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी अखेर आमदार शशिकांत शिंदे यांची निवड झाली आहे. पक्षाच्या आज झालेल्या बैठकीत विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर एकमताने शशिकांत शिंदे यांची त्या पदावर निवड करण्यात आली. या निवडीमुळे जयंत पाटील यांच्या राजीनाम्याविषयी गत 4 दिवसांत निर्माण झालेला संभ्रम संपुष्टात आला आहे. दरम्यान, शरद पवार गटाचे अनेक नेते सध्या सत्ताधारी महायुतीत जात आहेत. शशिकांत शिंदे यांच्यापुढे पक्ष एकसंध ठेवण्याचे मोठे आव्हान आहे.
शशिकांत शिंदे हे पक्षाच्या स्थापनेपासूनच शरद पवार यांचे खंदे सहकारी राहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीवेळी त्यांनी पवारांची निष्ठेने साथ दिली. पश्चिम महाराष्ट्रातील प्रभावशाली नेतृत्व म्हणून त्यांची ओळख असून, त्यांना संघटनात्मक कामाचा दांडगा अनुभव आहे. शशिकांत शिंदे यांच्या पुढे संघटना बळकट करण्याचे मोठे आव्हान आहे.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या बदलाची चर्चा सुरू होती. जयंत पाटील यांनी गेल्या सात वर्षांपासून पक्षाची धुरा सांभाळली. गत 10 जून रोजी पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात जयंत पाटील पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची चर्चाही सुरू झाली होती. आज अखेर शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली. आता शशिकांत शिंदे यांच्यावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला चांगला विजय मिळवून देण्याची जबाबदारी असणार आहे. दरम्यान, मी राष्ट्रवादीपासून लांब जाईन असा विचार करू नका, प्रदेशाध्यक्षांना 2 वर्षांचा कालावधी असतो. पण, मला पवार साहेबांनी 7 वर्ष संधी दिली. मी पदावरून बाजूला होण्याची हीच योग्य वेळ आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.


