मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी मैदानात उतरलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी पदयात्रेने संपूर्ण राज्यभराचे लक्ष वेधून घेतले. मात्र आता बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय महामार्ग रोखून धरल्या प्रकरणी बच्चू कडूंसह 12 जणांवर यवतमाळच्या महागांव पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
बच्चू कडू यांच्या सातबारा कोरा पदयात्रेची समारोप सभा श्री गजानन महाराज मंदिर आंबोडा येथे नियोजित होती. मात्र ऐनवेळी आयोजकांनी व बच्चू कडू यांनी समारोप सभा आंबोडा उडान पुलावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर आयोजित केली. यावेळी ट्रॅक्टर महामार्गवर आडवे लावून वाहतूक पूर्णपणे बंद केली होती, यामुळे तीन तास दोन्ही बाजुची वाहतुक ठप्प झाली होती.
तसेच पदयात्रा संबंधाने आयोजकांनी कुठलेही कायदेशीर परवानगी घेतली नाही. आयोजकांनी बेकायदेशीर जमाव जमवून नियोजित ठिकाणी सभा न घेता ग्राम अंबोडा येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वरील अंबोडा उड्डाण पुलावर ट्रॅक्टर आडवे करुन व 5000 ते 7000 लोकांना राष्ट्रीय महामार्गाच्यामध्ये बसवुन वाहतुक थांबविली. तसेच प्रतिबंधक आदेशाचे उल्लघंन केले. या प्रकरणी बच्चू कडूंसह 12 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


