मुंबई : वृत्तसंस्था
मागील आठवड्यात ५ जुलै रोजीच्या मेळाव्यानंतर शिवसेना(उबाठा) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना युती होईल अशी चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली आहे. मात्र, अद्यापर्यंत या वृत्ताला ठाकरे बंधूंकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. मेळाव्याचे औचित्य हे मराठीचा मुद्दा असल्याचे सांगितले जात आहे.
उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांच्याकडून ठाकरे बंधू एकत्र येण्यावर सकारात्मक विधानं केली जात आहे. उद्धव ठाकरे यांनी देखील युतीबाबत प्रतिसाद दर्शविला आहे. मात्र, राज ठाकरे यांच्याकडून सावध भूमिका घेतली जात आहे. अशातच आता युतीबाबत स्वतंत्र अनौपचारिक गप्पांमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनीहीह मोठं भाष्य केले आहे.
युतीबाबत सध्या टप्प्याटप्प्याने प्रक्रिया सुरू असल्याचे उद्धव ठाकर म्हणाले आहेत. मेळाव्यानंतर ठाकरे बंधू एकत्र येऊ नये म्हणून अनेकांकडून प्रयत्न झाले, यापुढेही होतील असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. एकीकडे उद्धव ठाकरे यांच्याकडून एकत्र येण्यावर भूमिका घेत त्या दृष्टीने संकेत दिले जात आहेत. मात्र, दुसरीकडे राज ठाकरे यांनी एकत्रीकरणावर सावध भूमिका घेतली आहे.
अनौपचारिक गप्पांमध्ये उद्धव ठाकरे यांनी केलेले भाष्य लक्ष्य वेधून घेणारे ठरत आहे. निवडणुका जाहीर झाल्यावर युतीचा निर्णय होईल, असे विधान करून उद्धव यांनी युतीबाबत संकेत दिला आहे. यामुळे मनसे आणि शिवसेना युतीबाबात ते सकारात्मक असल्याचे स्पष्ट होत आहे.
मनसेच्या राज्यस्तरीय शिबिराचा आजचा दुसरा दिवस आहे. या शिबिरासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे काल इगतपुरीमध्ये दाखल झाले होते. राज यांनी इगतपुरी येथील मनसेच्या अनौपचारिक गप्पांमध्ये नोव्हेंबर डिंसेंबर दरम्यान चित्र स्पष्ट होईल, त्यानंतर युतीसंदर्भात बघू, असे विधान केले आहे. यामुळे आगामी काळात ठाकरे बंधूंच्या युतीबाबत काय निर्णय होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.


