मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात मराठी भाषेच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंनी विजयी मेळावा मोठ्या उत्साहात पार पडल्यानंतर आता सर्वच विरोधकांनी ठाकरे बंधूना लक्ष केले आहे. त्यात उद्धव ठाकरेंवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे आता भाजप नेते व खासदार नारायण राणे यांनी देखील ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
नारायण यांनी ट्विट करत म्हटले की, उद्धव ठाकरेंची सत्ता गेली आणि त्यांना हिंदूत्व, मराठी माणूस, कोकणची जनता व गिरणी कामगार यांचे प्रश्न दिसू लागले. सत्ता असताना कुठेही कोकणाला न्याय नाही, गिरणी कामगारांचे प्रश्न सोडवले नाहीत. मराठी माणसाकडे ढुंकूनही पाहिले नाही. एक नंबरचा स्वार्थी माणूस आहे हा, असा आरोप राणे यांनी केला आहे.
या पूर्वी देखील नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. ते म्हणाले होते, ज्या मराठी माणसांनी शिवसेनेला आधार दिला. शिवसेनेने मराठी माणसांच्या नावावर स्वतःचा उदरनिर्वाह केला. उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसांसाठी काय केले? यांना मुख्यमंत्रीपदाचे त्यांना काही महत्व नव्हते. अडीच वर्षांमध्ये केवळ दोन दिवस मंत्रालयात आले. मराठी माणसांसाठी, तरुणांसाठी, त्यांच्या नोकरीसाठी, पोटापाण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काय केले? मराठी माणसांसाठी आणि हिंदुत्वावर बोलण्याचा उद्धव ठाकरे यांना अधिकार नाही.
विजयी मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजप तसेच महायुतीवर जोरदार टीका केली होती. गद्दारी करून आमचे सरकार पाडले. तुमचे मालक तिकडे बसले आहेत. त्यांचे बुड चाटण्यासाठी तुम्ही हे सगळ करत आहात. ते म्हणतात म हा महापालिकेचा आहे. अरे म महाराष्ट्राचा आहे. आम्ही महाराष्ट्रही काबीज करू, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.
तसेच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील डिवचले होते. ते म्हणाले होते, आमच्यातील अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला. एकत्र आलो आहोत. आम्ही दोघे एकत्र आलो आहोत पण त्यासाठी कोण लिंबू कापतेय उतारा टाकत आहे. कोणी टाचण्या मारतय कोणी रेडे कापत असतील त्यांना एकच सांगणे आहे, या अंधश्रद्धेच्या विरोधात आमच्या आजोबांनी लढा दिला होता.


