मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी हिंदी – मराठी भाषेवरून राजकारण तापले असतांना मिरा भाईंदरमधील एका मिठाईच्या दुकानातील मालकाला मराठी बोलण्यावरून मनसैनिकांनी चोप दिला होता. यानंतर मराठी अमराठी वाद उफाळून आला. येथील व्यापाऱ्यांनी मनसैनिकांनी केलेल्या मारहाणाचा मोर्चा काढून निषेध नोंदिविला होता. या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, पोलिसांनी मोठी कारवाई करत मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाअध्यक्ष अविनाश जाधव यांना आज पहाटे त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे.
मनसेच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र अविनाश जाधव आणि मनसैनिक मोर्चा काढण्यावर ठाम होते. त्यामुळे पोलिसांनी आज पहाटे अविनाश जाधव यांना तब्यात घेतले आहे. तसेच मनसेच्या मीरा भाईंदर येथील इतरही पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले जात आहे. अमराठी व्यापाऱ्यांनी केलेल्या शक्तीप्रदर्शनाला प्रत्युत्तर देण्यासाठी हा मोर्चा मीरा भाईंदरमध्ये काढण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सांगण्यात आले होते. पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारत मनसैनिकांना नोटीसा बजवण्यात आल्या होत्या.
मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना देखील पोलिसांनी नोटीस बजावली होती. मात्र, आज मंगळवारी पहाटे पोलिसांनी मोठी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले आहे. या मोर्चाला मोठ्या संख्येने जमण्याचे आवाहनही त्यांनी केले होते. मोठ्या पोलीस फौजफाट्यासह अविनाश जाधव यांना त्यांच्या राहत्या घरातून आज मंगळार ८ जुलै पहाटे साडेतीन वाजता ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी केलेल्या कारवाईचा अविनाश जाधव यांनी तीव्र स्वरुपात निषेध नोंदिवला आहे. पोलिसांच्या प्रतिबंधनात्मक कारवाईबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मराठी जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यवरही गदा आणली जात आहे, पोलिस सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.


