राज ठाकरेंच्या विधानानंतर मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान !
पंढरपूर : वृत्तसंस्था
राज्यात हिंदी भाषा सक्ती करण्याचा जीआर रद्द केल्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे शिवसेनेचे पक्ष प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा संयुक्त विजयी मेळावा आज (दि.५) वरळी येथील एनएससीआय डोम येथे झाला. या मेळाव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.५) पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
सुमारे २० वर्षांनी उद्धव आणि मी एकत्र येत आहे. आम्हाला एकत्र आणणं बाळासाहेबांना जमलं नाही, जे इतर कोणालाही जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीस यांना जमलं, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी चिमटा काढला. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले की, राज ठाकरेंचे आभार मानतो, दोन बंधू एकत्र येण्याचे श्रेय त्यांनी मला दिले. त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळत असतील, असा टोला त्यांनी लगावला.
यावेळी फडणवीस यांची उद्धव ठाकरे यांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, मराठीबद्दल एक शब्द न बोलता, आमचं सरकार गेलं, आमचं सरकार पाडलं, आम्हाला निवडून द्या, हा मराठीचा विजय उत्सव नव्हता. त्यांना असूया आहे की, २५ वर्षे त्यांच्याकडे महानगरपालिकेची सत्ता असताना दाखविणे सारखे काहीच काम नाही.
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ज्या प्रकारे मुंबईचा चेहरा बदलला आहे. परंतु उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झाला आहे. आम्ही बीडीडी आणि पत्राचाळीतील माणसाला हक्काची मोठी घरे दिली आहेत. याची असूया त्यांच्या मनात आहे, असे फडणवीस म्हणाले. मराठी असो किंवा अ मराठी सगळेच आमच्या सोबत आहेत. मराठी असल्याचा मराठी भाषेचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही हिंदू आहोत, आम्हाला हिंदुत्वाचा अभिमान आहे, आमचे हिंदुत्व हे सगळ्यांना सोबत घेऊन जाणारे आहे, असे फडणवीस म्हणाले.


