मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसपासून शालेय शिक्षणात हिंदी सक्तीचा निर्णय घेतल्यावर अनेकानी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या आता यावर साहित्य व कला क्षेत्रातूनही विरोध होत आहे. संमेलनाध्यक्षा तारा भवाळकर यांच्यानंतर आता अभिनेते सयाजी शिंदे यांनीही महाराष्ट्रात हिंदीची सक्ती करण्याच्या त्रिभाषा धोरणाला कडाडून विरोध केला आहे. मुख्यमंत्री कोणत्या भाषेत शिकलेत? असा सवाल करत त्यांनी या प्रकरणी कोणत्याही एका पक्षाने निर्णय घेतला म्हणून महाराष्ट्रात हिंदीची सक्ती करू नये, असे ठणकावून सांगितले आहे.
सयाजी शिंदे बुधवारी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले, आमचे गाव मराठी, आमची भाषा मराठी, आमचा जिल्हा मराठी आणि आमचे राष्ट्रही मराठी. त्यामुळे आमच्या मराठीला पहिले प्राधान्य देण्यात यावे. तिसरी भाषा असणाऱ्या हिंदीला पाचवी-सहावीनंतर शिकवले जावे. हिंदी भाषेची सक्ती करणे पूर्णतः चुकीचे आहे. मी आज जो काही आहे ते केवळ माझ्या मराठी मातृभाषेमुळेच आहेत. माझ्या गावाची, जिल्ह्याची व राज्याची भाषा मराठी असताना हिंदी भाषा लहानपणापासून शिकवण्याची सक्ती कशासाठी?
ते पुढे म्हणाले, मी मराठीचा पदवीधर आहे. माझे मराठीत शिक्षण झाले. मराठी एवढे समृद्ध वाङ्मय इतर कोणत्याही भाषेत नाही. 5-6 वर्षांच्या मुलाला मराठीची शब्दरचना किंवा वाक्यरचना समजून घेण्यापूर्वी त्याच्यावर हिंदी लादण्याचे धोरण कशासाठी? हे धोरण पूर्णतः चुकीचे आहे. मुख्यमंत्र्यांनी या धोरणाचे महत्व सांगितले असले तरी ते मला पटत नाही. या गोष्टीला गावोगावी सर्वांनी विरोध करायला हवा. हिंदीची सक्ती पाचवी-सहावीनंतर करा.
सयाजी शिंदे आपले मत मांडताना पुढे म्हणाले की, मी 12 भाषेत काम करतो. पण लिहून घेताना ते मराठीतच लिहून घेतो. मग ते समजून घेतो. आपण ज्या मातृभाषेत शिकतो, त्याच मातृभाषेनुसार आपण विचार करतो. त्यामुळे मुख्यमंत्री असो किंवा भाषाशास्त्राचे अभ्यासक, सर्वांना हे धोरण मागे घेण्याची माझी विनंती आहे. हिंदीच्या सक्तीविषयी मराठी कलाकार समोर येत नसले तरी, त्यांच्या प्रतिनिधी म्हणून मी बोलतो. हिंदी भाषेची सक्ती नको.
भारतात मराठी भाषा श्रेष्ठ आहे. सध्या जिल्हा परिषद शाळांची स्थिती खूप वाईट आहे. लहानपणी आम्हालाही इंग्रजी येत नव्हती. त्यामुळे आम्हाला हिणवले जायचे. पण माझा एटीट्यूड वेगळा होता. मराठीनेही आपल्या ग्रामीण भाषेची वाट लावली. 60 वर्षांपूर्वी माझ्या आई-वडिलांनी मला जे शिकवले, ते मला आता योग्य वटाते. त्यांच्याकडे शील अश्लीलता नव्हती. जातीपातीचे भेद नव्हते. पण अलीकडे इंग्रजी भाषेमुळे हे सर्व बदलत गेले.
घटनेनुसार हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. तो एखाद्या पक्षाचा अजेंडा असू शकतो. ज्याने त्याने आपापल्या राज्य भाषेला आदर द्यायला हवा. पण तो लादायला नको. मुख्यमंत्री नेमके कोणत्या भाषेत शिकलेत हे मला समजत नाही. ते मराठीतच शिकलेत ना. त्यांनीही मराठीला प्राधान्य दिले पाहिजे, असेही सयाजी शिंदे यावेळी बोलताना म्हणाले.


