मुंबई : वृत्तसंस्था
गेलीय काही दिवसापासून राज्याच्या राजकारणात राज व उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीची चर्चा आहे. पण मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सोमवारी एका पोस्टद्वारे ठाकरे गटावर जहरी टीका केल्यामुळे या युतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आम्ही नवीन आहोत, पण कधी केम छो वरळी म्हणत आम्ही कुणाचेही पाय चाटले नाहीत, असे त्यांनी म्हटेल आहे. दरम्यान, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी संतप्त प्रतिक्रिया देत महाराष्ट्र व मराठी माणसाच्या हितापुढे सगळ्या प्रकारच्या टीकाटिप्पणी क्षुल्लक असल्याचे स्पष्ट केले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्र हितासाठी तथा मराठी माणसाच्या भल्यासाठी जुने वाद विसरण्याची तयारी दर्शवली होती. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्याला सकारात्मकि प्रतिसाद दिला होता. त्यानंतर मनसे व ठाकरे गटाचे कार्यकर्ते व पदाधिकारीही एकमेकांशी सूसंवाद साधताना दिसून आले होते. यामुळे दोन्ही पक्षांच्या युतीच्या चर्चेने जोर धरली असताना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटावर अत्यंत तिखट शब्दांत निशाणा साधला आहे. यामुळे या संभाव्य युतीविषयी अनिश्चितता निर्माण झाली आहे.
होय, आम्ही नवीन आहोत, पण कधी केम छो वरळी म्हणून कोणाचे पाय चाटले नाहीत, जिलेबी अने फाफडा उद्धव ठाकरे आपडा असे म्हणालो नाही. मुस्लिमांची मते मिळवण्यासाठी वीस हजार केसेस आपल्याच भावाच्या कार्यकर्त्यांवर टाकल्या नाही याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही नवीन आहोत, पण तुम्ही जुने असून काय उपटले, असे संदीप देशपांडे सोमवारी आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले. त्यांच्या या विधानावर ठाकरे गटाकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटण्याची चिन्हे आहेत.
दुसरीकडे, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाविषयी अत्यंत संयमी प्रतिक्रिया दिली आहे. युती होण्यामध्ये जाणिवपूर्वक कोणी कितीही मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला तरी, महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितापुढे सगळ्या प्रकारच्या टीकाटिप्पणी शुल्लक आहेत. आपण संयमी नेतृत्वाचे शिलेदार आहोत. सकारात्मक आहोत. राहू. महाराष्ट्रद्रोह्यांचे मनसुबे हाणून पाडू, असे सुषमा अंधारे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.


