मुंबई : वृत्तसंस्था
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे. “खरी शिवसेना एकनाथ शिंदेंची आहे, हे त्यांनी दाखवून दिले आहे,” असे अमित शहांनी म्हटले. त्याचबरोबर, मुंबईवर अनेक वर्षे राज्य करणाऱ्यांनी शहरासाठी काय केले, असा सवाल उपस्थित करत त्यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवर टीका केली.
उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना अमित शाह आणि भाजपवर जोरदार टीका केली होती. देशाला गृहमंत्र्यांची गरज आहे. घरफोड्या अमित शाहची नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी अमित शहांवर निशाणा साधला होता. या टीकेला अमित शाह यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी मुंबईसह महाराष्ट्राच्या विकासावर बोलताना विरोधी पक्षांवर टीका केली. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चर च्या नवनिर्मित मुख्यालयाच्या इमारतीचे आणि मुंबईत राज्यस्तरीय सहकारी औद्योगिक परिषदेचे उद्घाटन अमित शाह यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
अमित शहा यांनी महाविकास आघाडी सरकारच्या मुंबईतील विकासकामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “महायुती सरकारने अटल सेतू, वरळी सी लिंक, कोस्टल रोडसारखे अनेक मोठे प्रकल्प यशस्वी केले आहेत. परंतु, तुम्ही सरकारमध्ये एवढा काळ होता, तेव्हा तुम्ही मुंबईसाठी काय केले?” असा सवाल त्यांनी केला. आधीच्या सरकारला महाराष्ट्रात उद्योगधंद्यांना चालना देता आली असती, परंतु त्यांनी काही केले नाही, असा आरोपही शहा यांनी केला.
सध्याच्या ‘डबल इंजिन’ सरकारचे कौतुक करताना अमित शहा म्ह’डबल इंजिन’ सरकारचे कौतुकणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने नेण्याचे चांगले काम करत आहेत. मुंबईतील झोपडपट्ट्या, धारावी आणि वाहतूक कोंडीच्या प्रश्नांवरून विरोधक टीका करत असले तरी, ही कामे त्यांनाही करता आली असती. त्यांनी न केल्यामुळे ती करण्याची वेळ आमच्यावर आली आहे, असे शहा यांनी नमूद केले.


