जळगाव : प्रतिनिधी
पोलिसांना पाहून पळ काढणाऱ्या टोळीच्या वाहनाचा पाठलाग करताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या अंगावर गुरे चोरी करणाऱ्यांनी वाहन घातले. ही धक्कादायक घटना अकोला जिल्ह्यात सोमवारी (१६ जून) पहाटे ३:४० वाजता घडली. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आले, अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्री यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते उपस्थित होते.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील, पोउनि अनिल जाधव, पोहेकॉ दर्शन ढाकणे हे १५ जून रोजी रात्री जिल्ह्यात गस्त घालत होते. मुक्ताईनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कुंड गावात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने एका घराकडे जाणाऱ्या चार जणांना एलसीबीचे पथक दिसताच ते कारमध्ये बसून भरधाव वेगाने निघून गेले. दरोडेखोर असल्याच्या संशयावरून पथकाने त्यांचा पाठलाग सुरू केला व बुलढाणा, अकोला जिल्ह्यात नाकेबंदीविषयी कळविले. तरीदेखील कारमधील टोळी थांबली नाही.
अखेर पहाटे ३:४० वाजेच्या सुमारास अकोला जिल्ह्यातील रिधोरा, ता. बाळापूर शिवारात अकोला पोलिसांनी ट्रक आडवा लावला व तेथे कार थांबली. पथक कारजवळ जात असताना चार जणांनी पळ काढला, मात्र कारचालक अरबाज खान फिरोज खान (२३, रा. अकोला) याने एलसीबीच्या पथकावर वाहन आणून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. यात पोलिस निरीक्षक पाटील यांना मुका मारा लागला. पथकाने चालकाला अटक केली. तसेच संध्याकाळी अकोला पोलिसांनी अफजल सैयद या दुसऱ्या संशयितालाही अटक केली. टोळीतील सैयद फिरोज उर्फ अनडूल सैयद झहीर (रा. कसारखेडा, जि. अकोला), इमरान, तन्नू उर्फ तन्वीर (दोघांचे पूर्ण नाव समजू शकले नाही), अफरोज खान उर्फ अप्प्या हे चौघे जण पसार झाले. अटक केलेल्या अरबाज खान याच्यावर या अगोदरही गुरे चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तसेच बाळापूर, खामगाव पोलिस ठाण्यात दाखल प्रत्येकी एक व जळगाव जिल्ह्यातही दाखल तीन गुन्हे उघड झाले आहेत.


