भुसावळ : प्रतिनिधी
पालिका अंतर्गत कार्यरत असलेल्या सफाई कामगाराला सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करत असताना शिवीगाळ व नोकरी घालविण्याची धमकी देण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सफाई कामगार उमेश रामलाल जेधे (वय ४१, रा. भारत नगर, भुसावळ) यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी ६:३० वाजता उमेश जेधे नेहमीप्रमाणे आपल्या कर्तव्यासाठी पापा नगर येथे गेले होते. सकाळी आठच्या सुमारास पापा नगर येथील ईकबाल कालू शेख (४५) यांच्या घरासमोरील मुख्य रस्त्यावर साफसफाई करत असताना वाऱ्यामुळे रस्त्यावरील कचरा त्यांच्या घराजवळ गेल्यामुळे ते संतप्त झाले. त्यांनी शिवीगाळ करीत धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान घटनेच्या निषेधार्थ नगरपालिकेच्या सफाई कामगारांनी बाजारपेठ तालुका पोलिससमोर काही वेळ घोषणा देत निषेध नोंदविला. यावेळी कामगार एकवटले होते.


