जळगाव : प्रतिनिधी
नागपूरहून धुळ्याकडे जाणाऱ्या टँकरवरील चालकाला डुलकी लागल्याने ते विरुद्ध दिशेला उभ्या असलेल्या ट्रॉलावर धडकले. सुदैवाने यात कोणाला दुखापत झाली नाही. मात्र वाहनांचे नुकसान झाले. हा अपघात रविवारी (१५ जून) सकाळी ११.३० वाजता आकाशवाणी चौकात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, वापी येथून बॉयलर टैंक घेऊन बिहारकडे जाणारा ट्रॉला (सीजे ०७, सीए ४६८२) आकाशवाणी चौकात सिग्नलजवळ उभा होता. त्यावेळी नागपूरकडून धुळ्याकडे जाणाऱ्या टँकरवरील (जीजे १६ एडब्ल्यू ९६१५) चालक निशांत सिंग (२३, रा. पिलीभीत, उत्तर प्रदेश) याला डुलकी लागली व ते थेट दुभाजक ओलांडून ट्रॉलाच्या चालक कॅबिनजवळ धडकले. सुदैवाने तेथे असलेला ट्रॉलाचालक विरेंद्र जाधव (३५ रा. नालंदा, बिहार) याला दुखापत झाली नाही. मात्र ट्रॉलाच्या कॅबिनचे नुकसान झाले.
वाहतूक कोंडी अपघातानंतर वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यावेळी जिल्हापेठ पोलिस घटनास्थळी पोहोचले व दोन्ही वाहनांना बाजूला करीत वाहतूक सुरळीत केली. दोन्ही वाहनांवरील चालकांना जिल्हापेठ पोलिस ठाण्यात चौकशीसाठी नेण्यात आले.
टैंकर धुळ्याकडे जात असताना आकाशवाणी चौकाजवळील उड्डाणपुलावर पोहोचण्यापूर्वीच चालकाचा डुलकी लागली व ते विरुद्ध बाजूला गेले. सुदैवाने त्यावेळी तेथे इतर लहान वाहने तेथे नव्हती. तसेच उड्डाणपुलावर डुलकी लागून ते बाजूला गेले असते तर मोठा अनर्थ झाला असता, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.


