अमळनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील वावडे येथे विहिरीचे पाणी भरण्यावरून वाद होऊन सहा जणांनी मारहाण केल्याने हात मोडल्याची घटना ७ रोजी घडली.
सविस्तर वृत्त असे कि, वावडे येथील नरेंद्र भीमराव वानखेडे (३०) हा ७ जून रोजी शेतात कपाशीला पाणी देत असताना बाजूच्या शेतात काम करणारे त्याचे काका शिवाजी विठ्ठल पाटील यांनी मोटरचा फ्यूज काढून घेतला. नरेंद्र याने याबाबत विचारले असता त्याचा राग आल्याने दोघात बाचाबाची झाली. त्यामुळे बाजूच्या शेतात काम करणाऱ्या फिर्यादीच्या काकू सुलाबाई शिवाजी पाटील, दुसरे काका गुलाब विठ्ठल पाटील, चुलत भाऊ ज्ञानेश्वर गुलाब पाटील, त्याची पत्नी आशाबाई ज्ञानेश्वर पाटील, पुतण्या प्रतीक ज्ञानेश्वर पाटील यांनी शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी, काठीने व लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. त्यानंतर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी येऊन नरेंद्र याची सुटका केली. या मारहाणीत त्याला जबर दुखापत होऊन त्याचा उजवा हात फॅक्चर झाला आहे. खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्याने सहा जणांविरुद्ध मारवड पोलिसात तक्रार दाखल केली आहे.


