जळगाव : प्रतिनिधी
कासमवाडी परिसरातील आठवडे बाजारात खरेदीसाठी गेलेल्या एका महिलेच्या गळ्यातून अज्ञात चोरट्याने १७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे फॅन्सी मंगळसूत्र लंपास केल्याची घटना ७ जून रोजी सायंकाळी ५:३० वाजता घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जयश्री संजय धरम (वय ३०, रा. महाबळ) या ७ जून रोजी संध्याकाळी ५:३० ते ७:४५ वाजण्याच्या सुमारास शहरातील कासमवाडी भागात, आठवडे बाजार परिसरात एका हॉस्पिटलसमोरील रोडवर उभ्या होत्या. याचवेळी गर्दीचा फायदा घेऊन, कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे १७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे फॅन्सी मंगळसूत्र चोरून नेले. या प्रकारानंतर जयश्री धरम यांनी तात्काळ एमआयडीसी पोलिसांकडे धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीनुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहे. गेल्या महिन्याभरात आठवडे बाजार, नवीन बसस्थानक परिसर, फुले मार्केट व टॉवर चौक भागात गर्दीचा फायदा घेऊन, महिलांचे दागिने लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे.


