नेवासा : वृत्तसंस्था
बंगळुरू येथे आयपीएलचा जल्लोष ११ क्रिकेटप्रेमींच्या मृत्यूचे कारण ठरल्याची घटना ताजी असतानाच आता महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) चे बोदवडचे चाहते आणि उदयोन्मुख क्रिकेटपटूंवरही आपत्ती कोसळली आहे.
पुणे येथे एमपीएलचा सामना पाहून परत येणाऱ्या या क्रिकेटप्रेमींचे वाहन नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला शिवारात सोमवारी पहाटे सव्वापाचच्या सुमारास ट्रकवर मागच्या बाजूने आदळले. या अपघातात दोन जण ठार तर चालक व तीन प्रशिक्षकांसह १५ जण जखमी झाले आहे. यात प्रथमेश योगेश तेली (वय १४, रा. बोदवड) याचा जागेवरच तर ऋषभ बबनराव सोनवणे (१४, रा. चिखली, ता. बोदवड) याचा उपचारादरम्यान नगर येथील रुग्णालयात मृत्यू झाला. जखमींवर नेवासा फाटा येथे उपचार करण्यात येत आहे. प्रशिक्षक गौरव सुनील भोई याच्या फिर्यादीवरून कारचालक अविनाश ऊर्फ रोशन निकम (रा. खामखेड, जि. बुलढाणा) यांच्यावर नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उस्थळ दुमाला येथे एक अपघात झाल्याने वाहतूक थांबलेली होती. अशा स्थितीतही चालकाने व्हॅन भरधाव वेगात पुढे नेत समोर उभ्या असलेल्या ट्रकला (क्र. एमएच ११ एएल ५११७) पाठीमागून जोराची धडक दिली.


